ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाचा सामना करीत होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत भावना व्यक्त केल्या आहेत.
“चांगली माणसं लवकर गेली की, प्रचंड निराशा येते. खचल्यासारखं होतं.”
किरण माने यांनी अतुल परचुरेंविषयी आठवण सांगताना म्हटले, “माझी आणि अतुल परचुरेंची खूप मैत्री वगैरे नव्हती. एकमेकांची नाटके बघणे आणि प्रयोगानंतर थोडी चर्चा करणं याव्यतिरिक्त फार संबंध आला नाही. पण, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आमचं एकमेकांशी दोन-तीन वेळा फोनवर बोलणं झालं. जे बोलणं झालं, ते खूप महत्त्वाचं होतं. गंभीर विषयांवर होतं. प्रस्थापितांशी बोलताना मी थोडा सावध असतो. माझ्याविषयी कुणाचा कुणी काय गैरसमज करून दिलेला आहे, ते माहीत नसतं. पण, अतुल पहिल्या फोनमध्येच अगदी जुनी मैत्री असल्यासारखं भरभरून बोलला. बोलण्यात आपुलकी होती. ज्या विषयांसाठी फोन झाला, त्या संदर्भात हातचं न राखता माहिती दिली. ज्या माहितीचा मला प्रचंड उपयोग झाला. ‘माणूस’ म्हणून हा लाखात एक आहे हे जाणवलं. चांगली माणसं लवकर गेली की, प्रचंड निराशा येते. खचल्यासारखं होतं. अलविदा अतुल”, असे म्हणत किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अतुल परचुरेंनी अनेक नाटके, टीव्ही मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘क्यूँ की मैं झूठ नहीं बोलता’, ‘चोर मचाये शोर’, ‘तुमसा नहीं देखा’ ‘खट्टा मिठा’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. त्याबरोबरच ‘होणार सून मी या घरची’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘यम हैं हम’ अशा टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
दरम्यान, किरण माने यांच्याबरोबरच अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, शुभांगी गोखले यांच्यासह इतर कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.