महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कलासक्त नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सढळ हस्ते मदत केल्याचे अनेक कलाकार सांगतात. चित्रपटांना प्राईम टाइम मिळवून देण्यापासून ते कलाकारांचा उचित गौरव करण्यापर्यंत राज ठाकरेंनी नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीला मदत केली आहे. महाराष्ट्र चित्रपट सेनेअंतर्गत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक समस्यांवर तोडगा काढला आहे. त्यामुळे मराठी कलाकारांचे त्यांच्यासोबत मैत्रीत्वाचे नाते आहे. बरेच मराठी कलाकार त्यांच्याविषयी भरभरून बोलतात. तसंच, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनीही राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक केलं आहे. ‘ते यारो का यार आहेत’, असं अतुल परचुरे म्हणाले. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. विरोधी बाकावर बसलेल्या अजित पवारांनी त्याच सरकारमध्ये आता सत्तेत सहभाग घेतल्याने राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या समर्थकांनी वेगळीच साद घातली आहे. राज ठाकरे वेगळा माणूस आहे, राज ठाकरेंना एकदा संधी देऊन पाहा, अशी मागणी केली जातेय. असाच प्रश्न पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे यांना विचारण्यात आला होता. ‘राज ठाकरे नेमका कसा माणूस आहे? राज ठाकरे काही बदलू शकतील का?’ असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अतुल परचुरे यांनी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा >> प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने काम मिळत नसल्याने इच्छामरणासाठी केलेला अर्ज, ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणाली “आमचे प्रयत्न…”

आम्ही शाळेपासून एकमेकांना ओळखतो

अतुल परचुरे म्हणाले की, “राज ठाकरे यांच्यात बदल घडवण्याची इच्छा आहे हे मी नक्की सांगू शकतो. त्यांना मनापासून वाटतं की जे चाललंय ते बदललं पाहिजे. हे मी मनापासून सांगू शकतो. याची मला खात्री आहे, कारण आमच्यात एवढी ओळख आहे. मी त्यांना शाळेपासून ओळखतो. ते माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहेत. तेव्हा मी बालनाट्यात काम करत होतो. मी फेमस होतो. कॉलेजमध्ये आल्यावर आमची रेग्युलर भेट होऊ लागली.”

“राज ठाकरेंकडे व्हिजन आहे. त्यांना मनापासून इच्छा आहे. ते खूप चांगले आहेत. ते यारो का यार आहेत. इतक्या सढळ हस्ते आपल्या आजूबाजूच्या माणसांना देणारा माणूसच नाही. हे मी मनापासून सांगतो कारण, मी खूप तास त्यांच्यासोबत घालवले आहेत”, असंही अतुल परचुरे म्हणाले.

राज ठाकरेंना ताकदीची गरज

सध्या जी काही राजकीय उलथापालथ सुरू आहे, त्यामध्ये राज ठाकरेसारखा माणूस असायला हवा असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर अतुल परचुरे म्हणाले की, “त्यांना ताकद दिली पाहिजे. आता ते एकटे आहेत. शेवटी तुमच्याकडे ताकद कधी येते जेव्हा तुमचे उमेदवार निवडून येतात, तुमचे आमदार खासदार असतात.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul parchure talking about raj thackeray and his vision in a podcast sgk