साजिद खान दिग्दर्शक असलेल्या ‘हमशकल्स’ चित्रपटाला मिळालेल्या यशाप्रित्यर्थ चित्रपटाचे निर्माते वासू भगनानी यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, जरी काही लोक चित्रपटावर टिका करत असले, तरी बॉक्स ऑफिसवरील चित्रपटाची कामगिरी काही वेगळेच सांगते. सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर, बिपाशा बसू, इशा गुप्ता आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला समिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर, सोशल मीडिया साइटवर या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडविण्यात येते आहे. २० जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने पहिल्या चार दिवसात ७६ कोटींचा धंदा केल्याचा दावा भगनानी यांनी केला. चित्रपटानी मिळवलेल्या यशाने आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या यशासाठी सर्वांचे धन्यवाद मानत ते म्हणाले, हा चित्रपट चांगला नसल्याचे म्हणत काही लोकांनी सोशल मीडिया साइटवर चित्रपटाची खिल्ली उडवली. परंतु प्रेक्षकांच्या प्रतिसादाने चित्रपट चांगला असल्याचे सिद्ध झाले.
सैफ, तमन्ना आणि बिपाशा यांच्याशिवाय चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत साजिदसह अन्य सर्वजण सहभागी होते. समीक्षकांनी चित्रपटावर झोड उठवल्याबाबत वासू भगनानी म्हणाले, आम्हाला चित्रपटसृष्टीत कार्यरत राहायचे असल्याने मी चित्रपट समीक्षकांबाबत काहीही बोलणार नाही. चित्रपटाबाबतचा तो त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट तयार करीत असून, चित्रपटाला मिळालेल्या यशाने आम्ही आनंदीत आहोत.

Story img Loader