एकीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षकच नसल्यामुळे शो नाकारले जात आहेत, तर दुसरीकडे चित्रपटगृहात हिंदी आणि अन्य चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे स्वत:हूनच मराठी चित्रपट निर्माते – दिग्दर्शक यांनी आपल्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा सपाटा लावला आहे. मे महिन्यात प्रदर्शित होणारे सगळेच चित्रपट जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ‘बलोच’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला योग्य वेळ मिळावा यासाठी ‘रावरंभा’ चित्रपटाचे प्रदर्शन आधीच पुढे ढकलण्यात आले होते. मात्र सध्या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिदासामुळे चित्रपटगृहात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत ‘रावरंभा’, ‘फकाट’ आणि ‘चौक’ या तिन्ही मराठी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

मराठी चित्रपटांना प्राइम टाइमचे शो अथवा चित्रपटगृहेच मिळत नाही अशी तक्रार मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांकडून वारंवार केली जाते. एप्रिल-मे महिना हा सुट्टीचा काळ लक्षात घेत अनेक मराठी चित्रपटांनी या दोन महिन्यांत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सगळी गणितं बदलली आहेत. त्याआधीच चित्रपटगृहेच मिळत नाही म्हणून ‘टीडीएम’ हा चित्रपट निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपटगृहातून काढून घेतला. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट चित्रपटगृहात सुरू असूनही ‘द केरल स्टोरी’चा फटका चित्रपटाला बसला. त्यामुळे सध्या हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग लक्षात घेत मराठी चित्रपट निर्मात्यांनी स्वत:च चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. इतर भाषिक चित्रपटांचे हाऊसफुल्ल खेळ सुरू असताना मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांचे आरक्षण आणि अपेक्षेप्रमाणे प्राइम टाइम शो मिळणार नाही या चिंतेमुळे हे चित्रपट पुढे ढकल्याण्यात आल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले.

मराठी प्रेक्षकांनीच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवल्यामुळे तिकीट बारीवर मराठी चित्रपटांची कमाईदेखील अतिशय कमी झाल्याची खंत निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे प्रेक्षक नाहीत ही चिंता तर दुसरीकडे प्रेक्षकांअभावी चित्रपटगृहातून शो न मिळण्याची टांगती तलवार या निर्मात्यांच्या डोक्यावर आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होणार होता, आता तो २६ मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. तर श्रेयस जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ आणि देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ हे १९ मे रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट आता २ जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या  महिन्यात गाजलेल्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाव्यतिरिक्त अनेक हिंदी, तेलुगू, इंग्रजी, तमिळ अशा विविध भाषेतील मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे अथवा प्राइम टाइम शो मिळत नाही याहून जास्त दुर्दैवी काही असूच शकत नाही, अशी खंतही मराठी चित्रपटकर्मीकडून व्यक्त केली जात आहे. मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा खर्चही आता वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रपटासाठी निर्मात्यांनी केलेल्या खर्चापैकी किमान निम्मा खर्च तरी प्रदर्शनानंतर वसूल झाला पाहिजे, या विचारानेच निर्माते घाईघाईत चित्रपट प्रदर्शित न करता थांबून योग्य वेळी चित्रपट प्रदर्शित करण्याला प्राधान्य देत आहेत.

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटामुळे चित्रपटगृहे आणि प्राइम टाइम शो व्यापलेले आहेत. माझा ‘रावरंभा’ हा चित्रपट निर्मिती खर्च आणि  कथेच्या अनुषंगाने फार मोठा असल्यामुळे मला तो प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा आहे. इतर चित्रपटांच्या गर्दीत तो हरवू द्यायचा नसल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कोणत्याही वाद-विवादात किंवा टीका टिप्पणीच्या जंजाळात मला अडकायचे नाही’.

-अनुप जगदाळे, दिग्दर्शक (रावरंभा चित्रपट)

‘पाच वर्ष मेहनत केलेल्या ‘चौक’ या चित्रपटासाठी चित्रपटगृहच मिळाले नाही तर दिग्दर्शक म्हणून माझे, कलाकारांचे आणि निर्मात्यांचे नुकसान होईल. आणि ‘चौक’ या चित्रपटातून मला जो विषय मांडायचा आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळेच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. इतर चित्रपटांच्या गर्दीत केवळ एक किंवा दोन शो मिळाले तर आमच्या कष्टाला काही अर्थ उरणार नाही’.

– देवेंद्र गायकवाड, दिग्दर्शक (चौक चित्रपट)

‘फकाट’ चित्रपट याआधी १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान इतर चित्रपटही रांगेने प्रदर्शनाच्या मार्गावर होते. प्रेक्षकांनाही कोणता चित्रपट नेमका पाहावा यासाठी वेळ हवा आणि आपला चित्रपट प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हा दिग्दर्शक म्हणून अट्टहास असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे नेण्यात फायदा आहे’. 

– श्रेयस जाधव, दिग्दर्शक (फकाट चित्रपट)

Story img Loader