रसिका शिंदे
करोनाकाळानंतर खऱ्या अर्थाने ओटीटी माध्यमाची व्याप्ती वाढली आहे. घरबसल्या जगातील विविध प्रकारच्या अनेक भाषांतील कथा, वेब मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून पाहता येत असल्यामुळे प्रेक्षकांनी ओटीटी माध्यमाला विशेष पसंती दिली आहे. या माध्यमामुळे अनेक नवे कलाकार मनोरंजनसृष्टीला तर मिळालेच, पण बऱ्याच जुन्या आणि काही नवोदित कलाकारांनीही चित्रपटांकडून ओटीटी माध्यमावर आपला मोर्चा वळवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी गेल्या वर्षी ओटीटी माध्यमावर पदार्पण केले होते. यात नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, अजय देवगण, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार आहेत. नव्या वर्षांत कलाकारांच्या या यादीत आणखी काही जणांची भर पडणार आहे. नव्या वर्षांची सुरुवातच अभिनेता शाहीद कपूरच्या ओटीटी पदार्पणाने झाली आहे. त्याची मुख्य भूमिका असलेली ‘फर्जी’ ही वेबमालिका आधीच प्रेक्षकांसमोर आली आहे. आता आणखी काही नवे-जुने चेहरे येत्या काळात ओटीटी माध्यमावर दिसणार आहेत. बाल कलाकार म्हणून १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘कर्म’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. यानंतर अनेक चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या. सातत्याने यशस्वी चित्रपट देणारी उर्मिला काही काळ चित्रपटांपासून दूर होती. आता ती ओटीटी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ‘तिवारी’ या वेब मालिकेद्वारे ती ओटीटी माध्यमावर पदार्पण करणार असून आई आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित ही वेब मालिका असणार आहे. या मालिकेची कथा एका छोटय़ा शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित असून याचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले आहे. दरम्यान, कोणत्या ओटीटी माध्यमावर ही वेब मालिका प्रदर्शित करणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या काजोलनेही याआधी वेबपटांच्या माध्यमातून ओटीटी या नवमाध्यमावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंगा’ या चित्रपटातून ओटीटी माध्यमावर काजोलने पदार्पण केले होते. आता ओटीटी माध्यमावर ती वेब मालिकेत नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘द गुड वाइफ’ असे या वेब मालिकेचे नाव असून डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी वाहिनीवर ही मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेब मालिकेचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मा यांनी केले असून या मालिकेत काजोलबरोबरच कुब्रा सईत, शीबा चड्ढा, आमिर अली प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीला कपूर घराण्यातील अनेक कलाकार लाभले आहेत. या कपूर घराण्यातील नव्या पिढीची अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. करीना कपूरही लवकरच ओटीटी माध्यमावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटातून करीना ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. करण जोहर नवोदित कलाकारांना चित्रपटसृष्टीत आणणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. करण जोहरचेच दिग्दर्शन असलेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. अनन्या तिच्या लुक्स आणि फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. आता ओटीटी माध्यमावरील तिच्या पदार्पणामुळे ती चर्चेत आली आहे. करण जोहरचेच प्रॉडक्शन असलेल्या ‘कॉल मी बे’ या वेब मालिकेमधून अनन्या ओटीटी माध्यमावर येणार आहे. या वेब मालिकेत अब्जाधीश फॅशनेबल उद्योजकाची भूमिका साकारताना अनन्या दिसणार आहे. ‘कॉल मी बे’चे दिग्दर्शन कॉलिन डी कुन्हा यांनी केले असून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही वेब मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर अभिनेत्री सारा अली खानही या ओटीटीच्या स्पर्धेत मागे राहिलेली नाही. पदार्पणापासूनच मोठमोठय़ा दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर सारा आता ओटीटी माध्यमावरही आपले नशीब अजमावून पाहणार आहे. ‘ए वतन मेरे वतन’ या वेब मालिकेतून ती ओटीटी माध्यमावर पदार्पण करणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या या वेब मालिकेची निर्मिती करण जोहर करत असून दिग्दर्शन कन्नन अय्यर करत आहेत. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीवर ही वेब मालिका आधारित असून अभिनेत्री सारा अली खान स्वातंत्र्यलढय़ात गुप्त रेडिओ ऑपरेटर असणाऱ्या उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे नव्या वर्षांत एकाच वेळी ८०-९० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि अगदी अलीकडच्या नावाजलेल्या तरुण अभिनेत्री ओटीटी माध्यमांवर वेगवेगळय़ा भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नशीब अजमावणाऱ्या या अभिनेत्रींचे ओटीटीवरील पदार्पण त्यांना अपेक्षित यश देते का हे येता काळच ठरवेल.