मराठी चित्रपटाची गोष्ट, कलावंत, कथानक, गाणी-संगीत याचा दर्जा चांगला असण्याबरोबरच त्या चित्रपटाचे विपणन-प्रसिद्धीचे तंत्र आणि मंत्र याचाही मोठा सहभाग आजकाल असावा लागतो. हिंदी चित्रपटांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करीत ‘न्यू मीडिया’मध्ये गेम्सच्या माध्यमातून प्रसिद्धीमध्ये मुसंडी मारली आहे. परंतु, मराठीत आतापर्यंत फेसबुक पेज, ट्विटर, चित्रपटाची वेबसाइट एवढय़ापुरतेच मर्यादित पद्धतीने चित्रपटाची प्रसिद्धी केली जाते. श्री व्यंकटेश मूव्हीज् इंटरनॅशनल प्रॉडक्शन्सचा ‘१९०९- स्वातंत्र्ययुद्धातील एक ज्वलंत अध्याय’ या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ या अद्ययावत अ‍ॅप्लिकेशनची मदत घेण्यात आली आहे.
अ‍ॅप्लिकेशन कसे वापरायचे?
स्मार्टफोन, अ‍ॅण्ड्रॉइड फोन्सवर गुगल प्लेमध्ये जाऊन ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे. त्यानंतर ‘१९०९- स्वातंत्र्ययुद्धातील एक ज्वलंत अध्याय’ या चित्रपटाची वर्तमानपत्रातील जाहिरात उघडून १९०९ या अंकावर कॅमेरा धरायचा आणि अ‍ॅप्लिकेशन ऑन करायचे. त्यानंतर लगेचच तुमच्या मोबाइलच्या स्क्रीनवर या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा अनंत कान्हेरे व अन्य प्रमुख व्यक्तिरेखा दृग्गोचर होतील आणि चित्रपटातील संवाद म्हणतील. याद्वारे या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचे अनोखे तंत्र आणण्यात आले आहे. ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ हे नवीन डिजिटल तंत्रज्ञान असून आतापर्यंत हिंदी चित्रपटासाठीही या तंत्रज्ञानाचा प्रसिद्धीसाठी अद्याप वापर करण्यात आलेला नाही. १९०९ साली नाशिकच्या विजयानंद चित्रपटगृहात संगीत शारदा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना तत्कालीन ब्रिटिश राजवटीतील नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांची क्रांतिकारक अनंत कान्हेरे व त्यांचे सहकारी कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांनी हत्या केली होती. या ऐतिहासिक घटनेवर आधारित हा चित्रपट असून १० जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित होणार आहे. लेखन व दिग्दर्शन अभय कांबळी यांनी केले असून अक्षय शिंपी यांनी अनंत कान्हेरे ही प्रमुख भूमिका साकारली आहे. अन्य महत्त्वाच्या भूमिकेत अमित वझे, रोहन पेडणेकर, चेतन शर्मा, श्रीकांत भिडे, श्रीनिवास जोशी, शुभंकर एकबोटे आदी नाटय़ कलावंत प्रथमच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा