औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूबर काव्या यादव अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. युट्यूबर काव्या ही सोशल मीडियावर ‘बिंदास काव्या’ या नावाने लोकप्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण ती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई- वडील हैराण झाले होते. काव्याचा बराच शोध घेऊनही ती सापडत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांनी तिला घरी परतण्याचं आवाहन केलं होतं. पण आता काव्या सापडली असून, औरंगाबाद पोलिसांनी तिला लखनऊला जाणाऱ्या ट्रेनमधून ताब्यात घेतल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली आहे.
बेपत्ता झालेल्या काव्याचा शोध लागल्यानंतर तिच्या आई- वडिलांनी युट्यूबवर लाइव्ह येत याची माहिती दिली. अभ्यास करण्यासाठी आई- वडील ओरडल्याने काव्या घर सोडून निघून गेले होते. ट्रेनने ती लखनऊ या त्यांच्या मूळ गावी जात होती. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच सोशल मीडियावरूनही मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर पोलीसांनी शोध सुरू केला आणि काव्या त्यांना इटारसी येथे ट्रेनमध्ये सापडली.
आणखी वाचा-ट्विटरवरुन होतेय जुबिन नौटियाच्या अटकेची मागणी, वाचा नेमकं काय घडलंय
काव्याच्या आई- वडिलांनी लाइव्ह सेशनमध्ये पोलीस, चाहते आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच ते काव्याला घरी आणण्यासाठी इटारसीला रवाना झाले आहेत. काव्या ही अवघी १६ वर्षांची आहे. घरातून बाहेर पडताना तिने आपला मोबाईलही घरी ठेवला होता. तसेच तिच्याकडे पैसेही नसल्याचं तिच्या पालकांचं म्हणणं होतं. काव्या आता सापडल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
आणखी वाचा-औरंगाबादची युट्यूबर ‘बिंदास काव्या’ बेपत्ता, मदतीचं आवाहन करणाऱ्या आईचा व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान काव्या यादव ही ‘बिंदास काव्या’ या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय होती. युट्यूबवर तिचे ४.५ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवरही तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. तिचे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.