रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साध्या-सरळ नात्यातला गुंता गोष्टीतून दाखवणं हे तसं कठीण काम. तासन् तास एकेक धागा विणत, बारिकीने रंगीबेरंगी नक्षीकाम गुंफत एक कलाकार पैठणी विणत जातो. भान हरपून केलेली ती कारागिरी अंगावर लेवून आरशासमोर रूप न्याहाळताना स्त्री मन हरखून जातं. मनापासून एकेक धागा अलगद विणत जाणारे कारागीर जसे दुर्मीळ तसंच आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाची भावभावना अलवार जपत नात्यांची उबदार वीण गुंफणारी निर्मळ मनाची माणसंही सापडणं कठीण. त्यामुळे अशी आरस्पानी मनाची माणसं गाठीशी असणं म्हणजेही मोठी कमाईच म्हणायला हवी याची जाणीव शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटातून होते.

कर्नावाडी नावाच्या छोटय़ाशा गावात राहणारी इंद्रायणी, तिचा पती सुजीत आणि छोटा मुलगा श्री यांच्याभोवती लेखक- दिग्दर्शक शंतनू रोडे यांनी ही पैठणीची गोष्ट गुंफली आहे. फुलांचा व्यवसाय करणारा सुजीत आणि साडय़ांना फॉल बिडिंग करणारी, कपडे शिवून संसाराला हातभार लावणारी इंद्रायणी यांचा छोटासाच पण हसरा-खेळता संसार आहे. चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं करावं, दुसऱ्याचा मान ठेवावा इतकी साधी साधी तत्त्वं घट्ट मनाशी बाळगून जगणारी माणसं. स्वप्नं पाहावीत पण वास्तवात पाय घट्ट रोवून जगावं हे शहाणपण अंगी असलं तरी एखाददुसरा मोहाचा असा क्षण कधीतरी येतो. अगदी छोटीशीच तर इच्छा आहे.. काय होईल? असा क्षणभर मनात डोकावलेला विचार आकाशाएवढं संकट आपल्यावर येऊ शकतं या जाणिवेलाही झाकोळून टाकतो. आणि मग एरवीच खूप पैसे नसूनही सुंदर असणाऱ्या आयुष्याची घडी विसकटून जाते. इथे इंद्रायणी आणि सुजीतकडून अशी एक क्षणभराचीच चूक घडून जाते. लाखांची पैठणी मिळवण्यासाठी संघर्ष करता करता इंद्रायणीला वेगवेगळी माणसं आणि नात्यांमधील गुंतागुंत अनुभवायला मिळते. पैठणी ही इथे साडी राहात नाही, सीतेला जसं सोनेरी हरणाने मोहरून टाकलं होतं आणि तो हट्ट पूर्ण करण्याच्या नादात पुढचं सगळं रामायण घडलं.. तीच भावना या पैठणीच्या गोष्टीत अनुभवायला मिळते.

एका गोष्टीचे अनेक पैलू असतात. इंद्रायणीला प्रवासात भेटलेली माणसं, त्या माणसांचे स्वभाव, त्यांच्या गोष्टी हेही धागे तिच्या मनात जुळत जातात. त्यातून इंद्रायणीला नेमकं काय गवसतं हे सांगणं कठीण.. पण तोवर चार भिंतीत किंवा आपल्या माणसांतच वावरलेली इंद्रायणी पहिल्यांदा एकटीने बाहेर पडते. वेगवेगळय़ा माणसांमध्ये वावरते, आपल्यावर आलेल्या संकटाला खमकेपणाने तोंड देते. त्यात तिला तिच्या नवऱ्याचीही साथ मिळते. प्रामाणिकपणा, खरं बोलण्यासाठी लागणारं धाडस. एकमेकांबद्दलचा आदर- प्रेम या सध्याच्या जगात दुर्मीळ होत चाललेल्या तत्त्वांचं महत्त्व दिग्दर्शकाने या गोष्टीतून अधोरेखित केलं आहे. नात्यांची-भावनांची ही गोष्ट इंद्रायणीची भूमिका जीव ओतून करणारी सायली संजीव आणि वास्तवाची जाण असली तरी बायकोला सुखदु:खात साथ देणाऱ्या नवऱ्याची भूमिका करणारा सुव्रत जोशी या दोघांच्याही जोडीने अभिनयातून उत्तम रंगवली आहे. श्री झालेला बालकलाकार आरव शेटय़ेचा नैसर्गिक अभिनय आपल्याला या छोटय़ाशा गोष्टीतही हसवत राहतो. तशी अनेक चांगल्या कलाकारांची फौज या चित्रपटात आहे त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट कुठेच कमी पडत नाही. अर्थात, पैठणीची ही गोष्ट अधिक खुलवता आली असती, अधिक भावगर्भ करता आली असती हेही तितकंच खरं.

गोष्ट एका पैठणीची..
दिग्दर्शक – शंतनू रोडे
कलाकार – सायली संजीव, सुव्रत जोशी, आरव शेटय़े, मोहन जोशी, सविता मालपेकर, मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक, मधुरा वेलणकर आणि मिलिंद गुणाजी.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author reshma raikwar the story about relations goshta eka paithanichi film directed by shantanu rode amy