हल्लीची लहान मुले आजीआजोबांकडून पौराणिक गोष्ट ऐकण्यापेक्षाही टीव्हीवरील छोटा भीम, हनुमान, श्रीकृष्ण, राम-रावण यांच्या गोष्टी कार्टून्स आणि मालिकांद्वारे अधिक पाहतात. याचाच आधार घेऊन ‘अवताराची गोष्ट’ हा चित्रपट तयार करण्यात आला असून मुलांच्या कल्पनेत पौराणिक गोष्टींचे वेड किती आहे हे वेगळ्या नजरेने दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. यामध्ये मुलांमधील निरागसतेचा भाव दिग्दर्शकाने नेमका पकडला आहे. मुलांच्या भावविश्वाचे निरीक्षण करताना काही सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
सरत्या वर्षांत लहान मुलांचे भावविश्व उलगडणारे किंवा लहान मुलांच्या नजरेतून वेगळे काही भाष्य करण्याचा प्रयत्न मराठी दिग्दर्शकांनी केला. यातला या वर्षांतला ‘अवताराची गोष्ट’ हा शेवटचा चित्रपट आहे.
लहानपणी मुलांना पौराणिक गोष्टी खऱ्या वाटतात, सुपरहिरो संकल्पना त्यामुळेच लोकप्रिय ठरली आहे. अतिशय ताकदवान आणि सर्व दुष्टांना झोडपून काढील असा अवतार किंवा सुपरहिरो दाखवून त्याचे चमत्कार दाखविण्याचा प्रयत्न नेहमीच सुपरहिरो चित्रपटातून केला जातो. या चित्रपटात दिग्दर्शकाने याचा चांगल्या पद्धतीने वापर करीत वेगळे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कौस्तुभ हा १०-१२ वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र मंग्या यांना पौराणिक गोष्टींमधील व्यक्तिरेखांचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. कृष्णाचे नऊ अवतार झाल्यानंतर आता कली हा दहावा अवतार सुरू असून तो अवतार कोण हे मात्र कुणालाच माहीत नाही असे कौस्तुभची आजी त्याला गोष्टीतून सांगते. तेव्हा हा दहावा अवतार कोण हे शोधण्याबरोबरच कौस्तुभला तो अवतार आपण स्वत:च नाही ना याचाही तो आपला मित्र मंग्याच्या मदतीने शोध घेऊ पाहतो.
कौस्तुभचे आई-बाबा, आजी, ताई यांच्याबरोबरच कौस्तुभच्या घरात भाडय़ाने राहणारा अमोद दादा असे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. सरळसाधे कुटुंब, त्यांचे दैनंदिन व्यवहार, कौस्तुभचे आजीकडून रोज गोष्ट ऐकणे यावर विशेष प्रकाशझोत टाकत दिग्दर्शकाने कथानक उलगडले आहे.
मुलांना लहानपणी वाटणारी अंधाराची भीती, त्यावर मात केल्यानंतर होणारा आनंद, अंधार असेल तिथे भूत असते वगैरेसारख्या मोठय़ांकडून लहानग्यांनी ऐकलेल्या गोष्टी, त्याचा मुलांच्या भावविश्वावर होणारा विपरीत परिणाम हेही दिग्दर्शकाने सूक्ष्मपणे कौस्तुभ आणि मंग्या यांच्यावर गारूड केलेल्या पौराणिक गोष्टींच्या आणि चमत्कारांच्या माध्यमातून दाखविले आहे.
हा चित्रपट लहान मुलांचा तर आहेच, पण पौराणिक गोष्टींमधील चमत्कार आणि त्या गोष्टींची आवड निर्माण झाल्याने त्यातील चमत्कारांविषयी वाटणारे प्रचंड कुतूहल याचा वैज्ञानिक किंवा संयुक्तिक तर्कसुसंगत विचार करण्यावर होणारा परिणाम यामुळे मुलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो हे दिग्दर्शकाने सूचकपणे सांगितले आहे. त्यामुळे बच्चेकंपनीचा हा चित्रपट तर आहेच, पण त्याचबरोबर मोठय़ांनी पाहावा असाही निश्चितच आहे.
चित्रपटाचे संगीत उत्तम असले तरी सबंध सिनेमाच्या शेवटी घातलेले गाणे मंग्या आणि कौस्तुभ यांच्यावर चित्रित करून चित्रपटात आले असते तर चित्रपटाची रंजकता वाढली असती, असे वाटते.
कौस्तुभ आणि त्याचे कुटुंब यांच्यातील छोटय़ा छोटय़ा संवादांतून सहजविनोद करण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात न आल्यामुळे करमणुकीच्या पातळीवर चित्रपट खूप रंजक ठरत नाही हेही खरे. मात्र दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे ते या बंदिस्त कथानकातून सांगण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
आजीच्या भूमिकेतील सुलभा देशपांडे, कौस्तुभच्या भूमिकेतील मिहिरेश जोशी, मंग्याच्या भूमिकेतील यश कुलकर्णी, अमोद दादाच्या भूमिकेतील आदिनाथ कोठारे यांच्यासह लीना भागवत, रश्मी खेडेकर यांनी चोख अभिनय केला आहे.
अवताराची गोष्ट
निर्माता – सचिन साळुंके
दिग्दर्शक – नितीन दीक्षित
कथा-पटकथा-संवाद – नितीन दीक्षित
छायालेखक – नागराज दिवाकर
संगीत – गंधार
संकलन – मयूर हरदास
कलावंत – आदिनाथ कोठारे, लीना भागवत, बालकलाकार मिहिरेश जोशी, बालकलाकार यश कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, सुलभा देशपांडे, आशीष विद्यार्थी, रश्मी खेडेकर.