गेल्या काही महिन्यांपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक चढउतार सुरु आहेत. अनेक नियमांच्या बंधनामध्ये मालिकांची शुटिंग सुरु तर झालीत पण तरीही अजूनही वातावरण सर्वसामान्य व्हायला वेळ लागेलच. अशा वेळेला प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी अनेक वाहिन्या जुन्या, लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात करतायेत. त्यामुळे सर्वांची आवडती ‘अवघाचि संसार’ ही मालिका देखील पुन्हा सुरु होणार आहे.
झी युवा वाहिनीने आता लोकप्रिय मालिका अवघाचि हा संसार पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘वहिनीसाहेब’ या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु केल्या होत्या.
२००६मध्ये प्रदर्शित झालेल्या अवघाचि संसार मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर मालिका त्यावेळी अतिशय लोकप्रिय ठरली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. अमृताने यात आसावरी नावाच्या एका साध्या सरळ गावातल्या मुलीची भुमिका साकारली होती. आपल्या तत्वांशी प्रामाणिकअसणारी कर्तव्यनिष्ठ अशा आसावरीचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. आता ही मालिका २४ ऑगस्टपासून दुपारी ४ वाजता झी युवावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.