एखादीच एक गोष्ट असते मनात सांगायची आणि त्या गोष्टीला एका धाग्यात जोडून घेणारी अनेक अशी क्षणचित्रे आपल्या नजरेसमोर कायम रेंगाळत असतात. आठवणींचा तो ‘चित्र’पट प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने मनात जपलेला असतो. सिनेमाची कला शिकत असताना आपल्याच बालपणीच्या आठवांचा तो ‘चित्र’पट जसा आपल्या मनात आहे तसा तो लोकांनाही दिसावा, अशी इच्छा तरूण दिग्दर्शक अविनाश अरूणच्या मनात रेंगाळत होती. ‘किल्ला’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. ‘किल्ला’चे अनुभव सांगण्यासाठी दिग्दर्शक अविनाश अरूण, अमृता सुभाष, निर्माते निखिल साने, चित्रपटातील बालकलाकार अर्चित देवधर, पार्थ भालेराव, स्वानंद रायकर, गौरीश गावडे आणि अथर्व उपासनी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली.
काही कळायच्या आतच चित्रपट बनून गेला..
माझं लहानपण सतत फिरतीचं राहिलं आहे. वडिलांची कायम नोकरीमुळे बदली व्हायची आणि मग दरवेळी नवीन गाव, नवीन शाळा बदलावी लागायची. प्रत्येक वेळी नवीन जागेशी आणि लोकांशी जुळवून घेणं मला अवघड व्हायचं. कित्येकदा तर मध्येच सहामाही परीक्षेदरम्यान मला आहे ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जावं लागलं आहे. लहानपणी मला त्याची चीड यायची. म्हणजे मी आईवडिलांना चिडून सांगायचो की मी rv06कुठेच जाणार नाही, हे असं चालत राहिलं तर मी शाळेतच जाणार नाही, शिकणारही नाही, अशी धमकी द्यायचो. ‘किल्ला’मध्ये जो चिन्मय काळे आहे तो पुण्यात राहणारा आहे. वडील गेल्यानंतर आईच्या नोकरीमुळे त्याला गुहागरसारख्या खेडय़ात यावं लागतं. गुहागरमध्ये आल्यावर तिथली शाळा, मित्र यांच्याशी जुळवून घेताना त्याची होणारी घालमेल, आईबरोबरचा संवाद, तिच्याशी असलेलं नातं हे सगळं मी अनुभवलेलं आहे.
माझा बालपणीचा बराचसा काळ हा कोकणात गेला असल्याने तिथल्या ज्या आठवणी होत्या त्या कायम माझ्या नजरेसमोर तरळत असायच्या. ‘एफटीआय’मध्ये शिकत असताना त्या आठवणींवर आधारित चित्रपट करायचाच हे मनाने घेतलं होतं. पण इतक्या कमी कालावधीत हा चित्रपट करायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. २०११ साली मी एफटीआयमधून शिक्षण संपवून बाहेर पडलो होतो. त्यानंतर ‘कायपोचे’ चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून असिस्ट करत असताना त्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्माता होता. अजय राय याने मला एका दुसऱ्या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी बोलावलं होतं. त्या वेळी त्याने प्रादेशिक चित्रपटांसाठी काही कथा असतील तर त्या सुचव असं सांगितलं. ते ऐकल्यावर माझे कान टवकारले गेले. मी माझी ‘किल्ला’ची कल्पना होती ती त्याला सांगितली. त्याने त्याचा भागीदार अ‍ॅलनला सांगितली. तेव्हा माझ्याकडे पटकथाही तयार नव्हती, पण त्यांना कथाकल्पना आवडली.
२०१३ ची ही गोष्ट आहे. एप्रिलमध्ये पटकथेचं काम सुरू केलं. साधारण महिन्याभरात पाच ड्राफ्ट लिहिले. मेपासून कास्टिंग, लोकेशन या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सुरू झाल्या होत्या. जुलैपासून चित्रीकरण सुरू झालं. पाच महिन्यांत मी चित्रीकरण पूर्ण केलं, कारण निसर्गातले ऋतूप्रमाणे होणारे जे बदल आहेत ते मला टिपायचे होते. त्यानंतर चित्रपट तयार होऊन तो बर्लिन चित्रपट महोत्सवातही गेला. तिथे पहिल्याच शोला मुलांकडून मिळालेला टाळ्यांचा कडकडाट आश्चर्यात टाकणारा होता. ‘एस्सेल व्हिजन’च्या निखिल सानेंनीही तिथेच चित्रपट पाहिला आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी हा चित्रपट आम्ही करतो आहोत म्हणून निर्णयही देऊन टाकला. ‘किल्ला’ हा म्हणून मला योगायोगाने घडलेला चित्रपट वाटतो. कारण, मला काही कळायच्या आतच माझ्याकडून हा चित्रपट पूर्ण झाला होता, म्हणून तो माझ्यासाठी नेहमी एक  खास चित्रपट राहील.
दिग्दर्शक अविनाश अरूण

किल्लेदार
‘किल्ला’ चित्रपटाची भिस्त ही त्यात चिन्मयची भूमिका साकारणाऱ्या अर्चित देवधरसह पाच मुलांवर आहे. ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्थ भालेरावने यात बंडय़ाची भूमिका साकारली आहे. गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी हे आणखी तीन नवे बालकलाकार या चित्रपटाने दिले आहेत.
चिन्मय प्रेक्षकांना आवडेल का याचीच उत्सुकता?- अर्चित देवधर
‘किल्ला’ची सुरुवात झाली तेव्हा आम्ही पाचही जण एकमेकांना ओळखत नव्हतो तेव्हापासून ते आत्ता आमच्यात इतकी घट्ट मैत्री आहे इथपर्यंत आमचा प्रवास झाला. त्यामुळे चित्रपटात आमची ही मैत्री आहे ती लोकांना कशी वाrv10टेल, चिन्मयची भूमिका आवडेल का? याबद्दल जास्त उत्सुकता वाटते आहे. मी साकारलेला चिन्मय हा आईची बदली झाली असल्याने पुण्याहून गुहागरला आला आहे. आता गुहागर खूप चांगलं विकसित झालं आहे. मात्र चित्रपटातला काळ हा १९९० चा असल्याने तेव्हा ते बऱ्यापैकी खेडेगाव होतं. त्यामुळे चिन्मयला तिथे जमवून घेणं अवघड जातं आहे. तिथे शाळेत त्याला हे चौघं भेटतात. ते बऱ्यापैकी टवाळकी करणारे असे आहेत. चिन्मयला कुठेतरी त्यांच्याबरोबर राहणं आवडायला लागतं. त्यांच्या संगतीत राहून कुठेतरी तो ते करत असलेल्या सगळ्या गोष्टींची मजा घ्यायला लागतो, मात्र तो टवाळकी करत नाही. तो त्याचा स्वभाव नाही.
बंडय़ा कळत-नकळत चिन्याला खूप शिकवून जातो – पार्थ भालेराव
मुळात, आम्ही अगदी मैत्रीमैत्रीतच हा चित्रपट केला. अविनाश दादाची पद्धतही अशी होती की तो कधीच आम्हाला ओरडला नाही. कितीही रिटेक्स घ्यावे लागले तरी तो कधी चिडला नाही. त्यामुळे सहज पद्धतीने काम करताना मजा आली. मी जी बंडय़ाची व्यक्तिरेखा साकारली आहे तो वाह्य़ात गेलेला मुलगा आहे. आईवडील नाही, काकाच्या जरबेत असा वाढलेला बंडय़ा बाहेर बंडखोर आहे. त्यांच्या चांडाळचौकडीत नाही म्हणायला ‘युवराज’ हा त्याचा बॉस आहे. प्रत्यक्षात, युवराजला मोठेपणा देत आपल्याला हवं ते करून घेणारी अशी बंडय़ाची व्यक्तिरेखा आहे. बंडय़ाच्या सहज वागण्यातून कळत-नकळत तो चिन्मयला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो, अशी वेगळी व्यक्तिरेखा आहे. पण आमच्या पाचही जणांत मला आवडलेली व्यक्तिरेखा कोणती, असं विचारलं तर ‘चिन्मय काळे’ हेच माझं उत्तर आहे.
आम्ही सेटवर होतो तसंच पडद्यावर दिसलो – स्वानंद रायकर
मी यांच्यात एकदम नवीन आहे. याआधी मी कधीच काम के लेलं नाही. शाळेत ऑडिशन झाली आणि त्यात माझी निवड झाली. मात्र आपण एखादा चित्रपट करतो आहोत.. असं काही मोठं मला वाटलंच नाही इतक्या खेळीमेळीने आमच्याकडून काम करून घेतलं. त्यामुळे आम्ही सेटवर जसे खेळत होतो तसंच ते चित्रपटातही दिसतं.
बदली म्हणून आलो – अथर्व उपासनी
पार्थ आणि मी एकमेकांना ओळखतो. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. या चित्रपटात माझ्याआधी दुसराच मुलगा होता. पण ऐनवेळी त्याला शक्य झालं नाही म्हणून मग आणखी एका वेगळ्या मुलाला सांगितलं गेलं. त्यालाही ऐनवेळी अडचण आल्यानंतर मग पार्थने माझं नाव सुचवलं, मी अविनाशदादाबरोबर काम केलं होतं, त्यामुळे माझी निवडही झाली..
आम्ही जे खऱ्या आयुष्यात आहोत तेच चित्रपटातही केलं – गौरीश गावडे
मी युवराजची भूमिका केली आहे. चित्रपटात जो यांच्या ग्रुपमध्ये ‘डॉन’ आहे. तो स्वत:ही वाया गेलेला आहे आणि दुसऱ्यांनाही वाया घालवत असतो. आम्ही खऱ्या आयुष्यात आहोत तसंच आम्ही चित्रपटातही वागलो, त्यामुळे ते सोपं झालं..

सशक्त कथा सांगणारे तरुण दिग्दर्शक वाढतायत -अमृता सुभाष
खूप व्यक्तींना आपली स्वत:ची गोष्ट सांगायची आहे आणि कुठलीही तडजोड न करता ती सांगायची आहे. म्हणजे स्वत:ची वेगळी, विलक्षण गोष्ट सांगू इच्छिणारे तरुण दिग्दर्शक येत आहेत ही सध्याची सर्वात चांगली गोष्ट मराठी चित्रपटांकडे आहे. त्यामुळे संहिता खूप सशक्त येताहेत आपल्याकडे. नवनवीन कथा मांडणारे दिग्दर्शक मराठीत असल्याने वेगळ्या प्रकारच्या, स्ट्राँग व्यक्तिरेखा निर्माण होत आहेत आणि आम्हा कलाकारांसाठी ही पर्वणी ठरते आहे.

‘किल्ला’ असाधारण चित्रपट -निखिल साने, एस्सेल व्हिजन
‘किल्ला’ चित्रपट हा त्याच्या वेगळ्या दृश्यमांडणीमुळे अतिशय सुंदर आणि असाधारण असा चित्रपट झाला आहे. हा चित्रपट इतर कुठल्याही भाषेत अविनाशने केला असता तरी त्याला तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला असता इतक्या चांगल्या पद्धतीने आणि तपशिलासह तो तयार केला गेला आहे. या चित्रपटातला जो मुलगा आहे त्याचं स्वत:च्या अनुभवातून समृद्ध होत जाणं हा या चित्रपटाचा एक वेगळा पैलू ठरणार आहे. मराठीमध्ये आत्ताचे तरुण दिग्दर्शक आहेत त्यांनी त्यांच्या परिसरातील कथा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘फँड्री’, ‘ख्वाडा’सारख्या चित्रपटांमुळे वेगवेगळी संस्कृती, कथा आपल्याकडे येत आहेत आणि यामुळे मराठी चित्रपटविश्व अधिक समृद्ध, व्यापक होतंय.

‘किल्ला’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली पुण्याची ही पाच मुलं, अभिनेत्री अमृता सुभाष आणि या सगळ्यांची मोट एकत्र बांधणारा दिग्दर्शक अविनाश अरुण, निर्माते निखिल साने यांना प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने  एक्स्प्रेस टॉवर्सच्या हिरवळीवर एकत्रित आणणारा हा क्षण ‘सेल्फी’त टिपून घेण्याचा मोह आवरला नाही.  छाया: केविन डिसूझा

Story img Loader