एखादीच एक गोष्ट असते मनात सांगायची आणि त्या गोष्टीला एका धाग्यात जोडून घेणारी अनेक अशी क्षणचित्रे आपल्या नजरेसमोर कायम रेंगाळत असतात. आठवणींचा तो ‘चित्र’पट प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने मनात जपलेला असतो. सिनेमाची कला शिकत असताना आपल्याच बालपणीच्या आठवांचा तो ‘चित्र’पट जसा आपल्या मनात आहे तसा तो लोकांनाही दिसावा, अशी इच्छा तरूण दिग्दर्शक अविनाश अरूणच्या मनात रेंगाळत होती. ‘किल्ला’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. ‘किल्ला’चे अनुभव सांगण्यासाठी दिग्दर्शक अविनाश अरूण, अमृता सुभाष, निर्माते निखिल साने, चित्रपटातील बालकलाकार अर्चित देवधर, पार्थ भालेराव, स्वानंद रायकर, गौरीश गावडे आणि अथर्व उपासनी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली.
काही कळायच्या आतच चित्रपट बनून गेला..
माझं लहानपण सतत फिरतीचं राहिलं आहे. वडिलांची कायम नोकरीमुळे बदली व्हायची आणि मग दरवेळी नवीन गाव, नवीन शाळा बदलावी लागायची. प्रत्येक वेळी नवीन जागेशी आणि लोकांशी जुळवून घेणं मला अवघड व्हायचं. कित्येकदा तर मध्येच सहामाही परीक्षेदरम्यान मला आहे ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जावं लागलं आहे. लहानपणी मला त्याची चीड यायची. म्हणजे मी आईवडिलांना चिडून सांगायचो की मी
माझा बालपणीचा बराचसा काळ हा कोकणात गेला असल्याने तिथल्या ज्या आठवणी होत्या त्या कायम माझ्या नजरेसमोर तरळत असायच्या. ‘एफटीआय’मध्ये शिकत असताना त्या आठवणींवर आधारित चित्रपट करायचाच हे मनाने घेतलं होतं. पण इतक्या कमी कालावधीत हा चित्रपट करायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. २०११ साली मी एफटीआयमधून शिक्षण संपवून बाहेर पडलो होतो. त्यानंतर ‘कायपोचे’ चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून असिस्ट करत असताना त्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्माता होता. अजय राय याने मला एका दुसऱ्या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी बोलावलं होतं. त्या वेळी त्याने प्रादेशिक चित्रपटांसाठी काही कथा असतील तर त्या सुचव असं सांगितलं. ते ऐकल्यावर माझे कान टवकारले गेले. मी माझी ‘किल्ला’ची कल्पना होती ती त्याला सांगितली. त्याने त्याचा भागीदार अॅलनला सांगितली. तेव्हा माझ्याकडे पटकथाही तयार नव्हती, पण त्यांना कथाकल्पना आवडली.
२०१३ ची ही गोष्ट आहे. एप्रिलमध्ये पटकथेचं काम सुरू केलं. साधारण महिन्याभरात पाच ड्राफ्ट लिहिले. मेपासून कास्टिंग, लोकेशन या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सुरू झाल्या होत्या. जुलैपासून चित्रीकरण सुरू झालं. पाच महिन्यांत मी चित्रीकरण पूर्ण केलं, कारण निसर्गातले ऋतूप्रमाणे होणारे जे बदल आहेत ते मला टिपायचे होते. त्यानंतर चित्रपट तयार होऊन तो बर्लिन चित्रपट महोत्सवातही गेला. तिथे पहिल्याच शोला मुलांकडून मिळालेला टाळ्यांचा कडकडाट आश्चर्यात टाकणारा होता. ‘एस्सेल व्हिजन’च्या निखिल सानेंनीही तिथेच चित्रपट पाहिला आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी हा चित्रपट आम्ही करतो आहोत म्हणून निर्णयही देऊन टाकला. ‘किल्ला’ हा म्हणून मला योगायोगाने घडलेला चित्रपट वाटतो. कारण, मला काही कळायच्या आतच माझ्याकडून हा चित्रपट पूर्ण झाला होता, म्हणून तो माझ्यासाठी नेहमी एक खास चित्रपट राहील.
दिग्दर्शक अविनाश अरूण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा