बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना रणौत ही सध्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त आहे. कंगना निर्मिती करत असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री अवनीत कौर स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात अवनीत आणि नवाजुद्दीनच्या वयाच्या अंतरावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतंच अवनीतने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
अवनीतने वयाच्या ८ व्या वर्षी २०१० मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या रिअॅलिटी शोमधून करिअरला सुरुवात केली. यानंतर ती अलादीन आणि चंद्रनंदिनी सारख्या टीव्ही मालिकांमध्ये झळकली. यासोबतच ‘करीब करीब सिंगल’ आणि ‘मर्दानी 2’ या सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून अवनीत कौरचा हा पहिलाच चित्रपट आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या वयात २७ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे अवनीत ही तिच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळेच हा चित्रपट चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच अवनीतला ‘हिंदुस्तान टाईम्स’ या वृत्तपत्राने याबाबत प्रश्न विचारला होता. यावर ती म्हणाली की, “मी पुरुष आणि महिला अभिनेत्यांमधील वयाचे अंतर ही समस्या म्हणून बघत नाही. यापूर्वीही अनेक चित्रपटात असे घडलं आहे. पण त्या कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. अशा अनेक जोड्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची ती गरज आहे, असे कंगना मॅडमने सांगितले आहे आणि तिच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे”, असे अवनीतने सांगितले.
अवनीत कौर ही सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २ कोटी ९६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. “मात्र असे फॅन फॉलोइंग असणे म्हणजे या चित्रपटाच्या यशाची हमी असते, असे नाही. मला पहिला चित्रपट मिळण्यासाठी ३ ते ४ वर्ष लागली. जरी तुम्हाला फॅन फॉलोईंगच्या जोरावर एखादा चित्रपट मिळत असेल तर तो लोकांना आवडेल की नाही, हे तुमच्या टॅलेंटवर अवलंबून आहे,” असेही तिने यावेळी म्हटले.
कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. तर कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म्स’ अंतर्गत याची निर्मिती केली जात आहे. हा तिचा पहिला डिजीटल चित्रपट असणार आहे.