अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील नागरिकांनी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहनही भाजपाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत ही एकच चर्चा रंगली आहे. अशातच ‘रामायण’ या मालिकेत राम हे पात्र साकारणारे अरुण गोविल यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अरुण गोविल यांनी ट्विट करत भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार आहे असे म्हटले आहे.
इतिहास में आज का दिन स्वर्णिम अक्षरों में लिखा जाएगा। श्रीराम मंदिर के शिलान्यास से पूरी दुनिया के रामभक्तों का सपना साकार हो रहा है।आप सभी को हार्दिक बधाई और शुभकामनाऐं।
जय श्रीराम— Arun Govil (@arungovil12) August 5, 2020
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यावर अनेक कालाकार आपल्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त करत आहेत.
मंदिराचे प्रारूप
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.