अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. ताहिराला 0 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यामुळे तिच्यावर किमोथेरपीही करण्यात आली होती. या थेरपीमुळे तिला तिचे केसही गमवावे लागले होते. विशेष म्हणजे किमोथेरेपीचे सहा सेशन्स आणि मास्टेक्टॉमीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ताहिराला पुन्हा एकदा स्टेज 1a ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. मात्र तरीदेखील ताहिरा या साऱ्याला खंबीरपणे सामोरी जात आहे. ताहिरा अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आजारपणाचे अपडेट देत असते. तर आयुष्मानही सोशल मीडियाच्या माध्यातून अनेक वेळा तिला पाठिंबा, आधार देतांना दिसतो. आयुषमानने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर ताहिराचा एक टॉपलेस फोटो शेअर केला असून एक भावनिक पोस्ट लिहीली आहे.
ताहिराने हा फोटो शेअर करत वर्ल्ड कॅन्सर डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच या आजारासंदर्भात जे काही गैससमज असतील ते दूर करा असा मोलाचा सल्लाही दिला आहे. ताहिराची ही पोस्ट आयुष्माननेही शेअर केली असून एका चारोळीच्या माध्यमातून तिचा आत्मविश्वास वाढविला आहे.
ताहिराच्या कॅन्सरचं निदान झाल्यानंतर या दोघांनीही कधीहा हा आजार लपवला नाही. उलट दोघेही खुलेपणाने यावर बोलले. ताहिराने वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला असून आपल्या सर्जरीची जखम दाखविली आहे. त्यासोबतच तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
‘आज मी हा फोटो शेअर करुन माझा आजार दाखवत नाहीये, तर या आजाराशी लढण्याची माझी इच्छाशक्ती दाखवत आहे. मी या आजाराचा आणि या जखमांचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. जगात परफेक्ट असं काहीच नाही. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसंच स्वत:ला स्वीकारा’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान,ताहिरा लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. आपल्या चित्रपटात तिने माधुरी दीक्षितला कास्ट केल असून लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ताहिरा एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे.