आयुष्मान खुराना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो त्याचा विकी डोनर, अंधाधुन, बाला, दम लगा के हईश्शा, बरेली की बर्फी, गुलाबो सीताबो, ड्रीम गर्ल, आर्टिकल १५, बधाई हो, डॉक्टरजी, शुभ मंगल सावधान, बाला यांसारखे कैक चित्रपट. एका पंजाबी घरातला मुलगा एकेकाळी ट्रेनमध्ये गायचा आज बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग अभिनेता आहे. त्याचा हा प्रवास विविध रंजक वळणांचा आणि तसा खडतरही राहिला आहे. सध्याच्या घडीला रणवीर सिंग, रणबीर कपूर, खानमंडळी या सगळ्यांमध्ये वेगळेपण जपणारा अभिनेता कुणी असेल तर तो म्हणजे आयुष्मान खुराणा. हिंदीसिनेसृष्टीत जेव्हा अँग्री यंग मॅन अमिताभ यांची चलती होती आणि मारधाड, मसालापट प्रेक्षकांना आवडत होते तेव्हा अमोल पालेकर यांच्यासारखे चतुरस्र अभिनेते आपलं वेगळेपण टिकवून होते आणि आपला एक प्रेक्षक वर्गही त्यांनी तयार केला होता. आत्ताच्या काळातला आयुष्मान खुराना हा तसाच अभिनेता आहे.
पत्रकारितेत पदवी, आर. जे. म्हणून काम
आयुष्मान खुरानाने पत्रकारिता हा विषय घेऊन पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर दिल्लीतल्या बिग एफएम मध्ये आयुष्मान रेडिओ जॉकी म्हणून काम करू लागला. नंतर आयुष्मानने रोडीजच्या सिझन २ मध्ये भाग घेतला. या सिझनचा तो विनर ठरला. आयुष्मानच्या सहज अभिनयाबरोबरच त्याच्याकडे आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे त्याचं सहज सुंदर गाणं. हे गाणं त्याला इंडियन आयडॉल स्पर्धेकडे घेऊन गेलं. त्या मंचावर गाणं गाऊन आयुष्मान जजेसना इंप्रेस करु शकला नाही आणि रिजेक्ट झाला. मात्र तो निराश झाला नाही. हळूहळू तो अँकरींग करु लागला, काही रिअॅलिटी शोजमध्ये त्याने होस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हे करताना उजाडलं २०१२ आणि याचवेळी त्याने सिनेमा केला विकी डोनर.
विकी डोनरची रिस्क आणि यश
२०१२ मध्ये आलेला विकी डोनर हा सिनेमा आजही लोकांच्या लक्षात आहे. याचं कारण सिनेमाचा विषय. स्पर्म डोनरच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. स्पर्म डोनर नायक असा आजवर कुणी साकारला नव्हता. पहिल्याच सिनेमात आयुष्मानने हे धाडस केलं. एका अर्थाने रिस्कच घेतली आणि ते धाडस फळाला आलं. स्पर्म डोनेशनसारखा एक गंभीर आणि फारसा न बोलला जाणारा विषय किती खास ढंगाने या सिनेमातून मांडण्यात आला हे सिनेमा पाहूनच कळतं. यातल्या विकी अरोराच्या जागी आपण प्रेक्षक म्हणून आयुष्मानशिवाय इतर कुणाला ठेवूच शकत नाही. हेच आयुष्मानचं यश आहे. पहिल्याच सिनेमात सिक्सर मारल्यानंतर त्याने काही फ्लॉपही दिले. पण आयुष्मान प्रयोग करत राहिला आणि त्याने स्वतःला सिद्ध केलं. तसंच इंडियन आयडॉलमध्ये रिजेक्ट झाला तरीही ‘पानी दा रंग’, ‘नजम नजम’, ‘मिट्टी दी खुशबू’, ‘और मेरे लिये’ तुम काफी ही सुपरहिट गाणीही त्याने गायली. तसंच एमटीव्ही रोडीजच्या दुसऱ्या सिझनचा तो विजेता ठरला.
ट्रेनमध्येही म्हटलं गाणं
एका मुलाखतीत आयुष्मानने सांगितलं होतं की दिल्ली ते मुंबई या ट्रेनमध्ये मी आपल्या मित्रांसह गायचो. म्युझिक वाजवायचो. यातून जे पैसे मिळायचे ते आम्ही सगळे मित्र साठवायचो. ट्रेनमध्ये गाणं गाऊन जे पैसे मिळाले त्यातून आम्ही गोवा टूरही केली होती. विकी डोनर येण्याआधी आयुष्मानने कयामत आणि एक थी राजकुमारी या मालिकांमध्येही काम केलं. मुंबईत बराच काळ स्ट्रगल केल्यावर त्याला विकी डोनर सिनेमा मिळाला पण त्याने त्या संधीचं सोनं केलं. द कपिल शर्मा शोमध्ये आयुष्मानने हेदेखील सांगितलं होतं की जेव्हा माझे चित्रपट फ्लॉप झाले होते तेव्हा मी मित्रांसह एक बँड तयार केला होता आणि आम्ही लग्न समारंभ, इतर काही छोटे कार्यक्रम यांमध्ये गायचो. आयुष्मानच्या अभिनयातला एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे त्याचं टायमिंग. लोकांना काय आवडेल हे त्याला अगदी बरोबर समजलं आहे. त्यामुळेच इतके स्पर्धक असतानाही आयुष्मान स्वतःचं वेगळेपण टिकवून आहे.
डॉक्टरचा अभिनय करुन राहिला मुंबईतल्या रुग्णालयाच्या वसतिगृहात
आयुष्मान त्याच्या स्ट्रगलच्या काळात मुंबईत आला तेव्हा त्याला राहण्यासाठी जागा नव्हती. त्याचा किस्सा आयुष्मानने एका मुलाखतीत सांगितला होता. मी डॉक्टर बनून मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये राहिलो आहे. माझा मित्र MBBS करत होता. मी त्याला विचारलं राहण्याची काही सोय होईल का? पण तोदेखील शिकत होता. मग मी डॉक्टरांसारखा अॅप्रन घालायचो, चष्मा लावायचो आणि रुग्णालयात शिरायचो. त्यानंतर हळूच वसतिगृहात शिरायचो आणि मुक्काम करायचो असं मी जवळपास दोन महिने केलं आहे असा किस्सा आयुष्मानने सांगितला होता.
प्रयोगशील अभिनेता
आत्ताच्या घडीला प्रयोग करणारा कुणी अभिनेता असेल तर तो म्हणजे आयुष्मान खुराना. कारण ‘दम लगा के हईश्शा’ सिनेमात त्याच्या बरोबर काम करणारी अभिनेत्री भूमि पेडणेकर ही जाडजूड दाखवण्यात आली आहे. झीरो फिगरच्या ट्रेंडमध्ये आणि एकूणातच फिगर राखण्यात सगळ्या अभिनेत्री धन्यता मानत असल्याच्या काळात जाड्या अभिनेत्रीसह काम करणं हे आव्हानच होतं ते त्याने स्वीकारलं. ‘बाला’ या सिनेमात आयुष्माने टक्कल पडलेल्या बालमुकुंद शुक्ला म्हणजेच बालाचा रोल केला होता. या सिनेमातला ‘अमिताभ बच्चन अवतार गिल के रोलमें कैसे जी सकता है?’ हा त्याचा डायलॉग गाजला होता. पॅच लावलेल्या माणसाची भूमिका, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, केस हेअर ट्रान्सप्लांट या सगळ्या विषयांवर विनोदी पद्धतीने या सिनेमात भाष्य करण्यात आलं होतं. हा सिनेमाही लोकांनी डोक्यावर घेतला होता.
‘अंधाधुन’मध्येही वेगळ्या धाटणीची भूमिका
अंधाधुनमध्येही त्याने केलेली डेअरिंग मानली पाहिजे. यातल्या ‘आकाश’ला पियानो वाजवण्याचा प्रचंड छंद असतो. डोळस बनून पियानो वाजवण्यापेक्षा आंधळ्याचा अभिनय करुन आपण पियानो वाजवू अशा प्रकारचं वेड घेतलेला हा कलाकार आयुष्मानने यात साकारला आहे. तो एक खून पाहतो, तो खून एका बड्या अभिनेत्याचा असतो. त्यानंतर आकाशला खरोखरच अंधत्व येतं. असा हटके विषय या सिनेमात आहे. पियानो प्लेअर नावाचा इटालियन सिनेमा आहे, अंधाधुन या सिनेमाचा रिमेक आहे. पण यात आयुष्मानने अभिनय करताना त्याचं सगळं कसब पणाला लावलं आहे. राधिका आपटे, तब्बू यांच्याही प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. वेगळ्या धाटणीचा सिनेमा म्हणून हा सिनेमा आजही ओटीटीवर पाहिला जातो.
ड्रीम गर्लमध्ये आयुष्मानने स्त्री भूमिका साकारली आहे. तसंच ड्रीम गर्ल २ ही चांगलाच चालला. मुख्य भूमिकेतला अभिनेता स्त्री भूमिका साकारतो हे प्रदीर्घ काळाने सिनेसृष्टीत घडलं आहे. दोन्ही पार्टचा यशस्वी प्रयोग आयुष्मानने केला आहे. आयुष्मानचा आणखी कस लागला आहे तो म्हणजे ‘अनेक’, ‘अॅक्शन हिरो’ आणि आर्टिकल १५ या चित्रपटांमध्ये. आपल्यावर कॉमेडी स्टार असा शिक्का बसू नये म्हणून त्याने ही काळजी घेतल्याचं जाणवतं.
‘अॅक्शन हिरो’ सिनेमात आयुष्मान एक अॅक्शन हिरो असतो त्याच्या हातून चुकून एक खून होतो आणि मग सुरु होतो सूडाचा प्रवास त्यात काय काय घडतं हे नाट्यमय रित्या मांडलं गेलं आहे. सिनेमाचा शेवटही अनपेक्षित असाच आहे. आर्टिकल १५ मध्ये आयुष्मानने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था त्यातून घडलेली एक बलात्काराची घटना आणि त्याचा छडा लावणारा प्रामाणिक पोलीस अधिकारी तो वाटतो याचं कारण त्याचा कसदार अभिनय. ‘डॉक्टर जी’ पुरुष जर स्त्री रोग तज्ज्ञ झाला तर काय घडू शकतं याचा विनोदी अंगाने घेतलेला अनुभव म्हणजे हा सिनेमा. तसंच ‘बधाई हो’ देखील.. ‘बधाई हो’ सिनेमात चांगली नोकरी करत असलेला आणि लग्नाची स्वप्न पाहणारा मुलगा आहे, त्याचं लग्नही ठरतं आणि त्याला कळतं की आपली आई गरोदर आहे. हा सिनेमाही कॉमेडी अंगाने जाणारा पण सामाजिक संदेश देणारा होता. आयुष्मान खुराना अशा भूमिका साकारतो ज्या साकारण्याची हिंमत आत्तापर्यंत कुणीही केली नाही. त्याच्या यशाचं गमक हेच आहे असं म्हटलं पाहिजे. सर्जनशील आणि प्रयोगशील अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!