छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाची जादू पसरवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रात अत्यंत शोकाकूल वातावरण निर्माण झालंय. सुरेखा सिकरी यांना खरी ओळख ही ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकामधून मिळाली. या मालिकेत त्यांनी ‘दादी सा’ ची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या देशभरातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या. सुरेखा सिकरी यांच्या निधनानंतर अभिनेता आयुष्मान खुराना याने शोक व्यक्त केलाय. तसंच त्यांच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट सुद्धा लिहिलीय.
अभिनेता आयुष्मान खुराना याने दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्यासोबत ‘बधाई हो’ चित्रपटात एकत्र काम केलंय. या चित्रपटात सुद्धा सुरेखा सिकरी यांनी आयुष्मानच्या ‘दादी’ची भूमिका साकारली होती. सुरेखा सिकरी यांच्या निधनाची बातमी समजताच अभिनेता आयुष्मान खुरानाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केलाय. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्याने सुरेखा सिकरी यांच्यासोबतचा ‘बधाई हो’ चित्रपटातल्या सीनमधला एक फोटो देखील जोडलाय. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलंय, “प्रत्येक चित्रपटात आमचा एक परिवार बनत असतो आणि आमच्या स्वतःच्या परिवारापेक्षा चित्रपटाच्या परिवारासोबत जास्त वेळ घालवत असतो. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपैकी या चित्रपटात एक परिपूर्ण कुटुंब होतं, त्यात परिपूर्ण कलाकार देखील होते.”
यापुढे बोलताना आयुष्मान खुरानाने लिहिलं, “सुरेखा सिकरी या आमच्या परिपूर्ण कुटुंबातील मुख्य सदस्य होत्या…त्या माझ्या संपूर्ण वंशापेक्षाही जास्त प्रगतशील होत्या…तुम्हाला माहितेय का, त्या खऱ्या आयुष्यात सुद्धा तितक्याच खुल्या मनाच्या आणि मनसोक्त जगणाऱ्या व्यक्ती होत्या…मला आठवतंय, जेव्हा आमच्या चित्रपटाचं स्क्रिनिंग संपल्यानंतर त्या रिक्षामध्ये बसल्या होत्या. हे पाहून ताहिर आणि मी आम्ही दोघांनी त्यांना त्यांच्या घरी सोडलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की त्या आमच्या चित्रपटातील स्टार आहेत. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं…मला आणखी काम मिळालं असतं तर…..”
यापुढे या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “ताहिर आणि मी त्यावेळी थोडं आश्चर्य झालो…त्यांच्या चेहऱ्यावर थोडे निराशेचे हावभाव दिसून येत होते आणि त्या त्यांच्या इमारतीच्या दिशेने गेल्या. त्यांच्यासोबतची ती शेवटची भेट होती…एकदा फैज अहमद फैजच्या ओळी “मुझ-से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग” या एकदा वाचाच…सुरेखा सिकरी यांच्यावरचं प्रेम आणखी वाढेल…एक त्रुटिहीन कलाकार. एक सिद्धहस्त कलाकार. तुमची कमी कायम भासत राहिल…अविस्मरणीय आठवणींसाठी तुमचे आभार…”