गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahbadia) मोठ्या चर्चेत असल्याचे दिसत आहे. इंडिया गॉट लेटेंटमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे रणवीरला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत होते. याबरोबरच महाराष्ट्रासह आसाम राज्यातून त्याच्यावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत त्याला दिलासा मिळाला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे. रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यामध्ये गायक बी प्राकचा समावेश होता. ही आपली भारतीय संस्कृती नसल्याचे बी प्राकने म्हटले होते. आता मात्र बी प्राकने त्याला माफ केलं पाहिजे, असं म्हटलं आहे.
काही गोष्टी चुकीच्या असतात, पण…
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बी प्राकने म्हटले, “मी रणवीरचे पॉडकास्ट बघत असतो. मला त्याच्या शोमध्ये जायचे होते. आमच्या टीम गेल्या सहा-सात महिन्यांपासून याबाबत ठरवत होत्या. मात्र, कधी तो व्यग्र असायचा तर कधी मी व्यग्र असायचो”, पुढे बी प्राकने त्याला समाजाने माफ केले पाहिजे अशा भावना व्यक्त करत म्हटले, “तो जे बोलले ते चुकीचे होते, मात्र कोणी मनापासून माफी मागितली तर समाजाने माफ केले पाहिजे. काही गोष्टी चुकीच्या असतात, पण आपण बोलून जातो. जर तुम्ही माफ केले तर तुम्ही मोठे व्यक्ती बनता”, असे म्हणत आता रणवीर अलाहाबादियाला समाजाने माफ केले पाहिजे, असे बी प्राकने म्हटले आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर बी प्राकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले होते, “मी एका पॉडकास्टमध्ये जाणार होतो, बीअर बायसेप्स असे या शोचे नाव आहे. मी या शोमध्ये जाण्याचे रद्द केले, कारण तुम्हाला माहीत आहे की त्याने समय रैनाच्या शोमध्ये कसे शब्द वापरले आहेत. मला वाटते की ही आपली भारतीय संस्कृती नाहीये. लोकांना शिव्या देणे, लोकांना शिव्या शिकवणे ही कॉमेडी असू शकत नाही; मला समजतच नाहीये की ही कोणती पिढी आहे.” पुढे बी प्राकने म्हटले होते, “रणवीर अलाहाबादिया तू सनातनी धर्माचा प्रचार करतोस, अध्यात्माविषयी बोलतोस, इतके मोठमोठे लोक, संत तुझ्या पॉडकास्टमध्ये येतात आणि तुझे इतके घाणेरडे विचार आहेत?”
दरम्यान, प्रसिद्ध यूट्यूबर गौरव तनेजानेदेखील काही दिवसांपूर्वी व्हिडीओ शेअर करीत सुरुवातीला रणवीरच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल जो आवाज उठवला जात होता, त्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. मात्र, नंतर रणवीरला लक्ष्य केले जात असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. याबरोबरच राखी सावंतनेदेखील सोशल मीडियावर रणवीरला माफ करा, कधी कधी चूक होते, मात्र माफ करा असे म्हटले होते; तर अनेकांनी रणवीरकडून ही अपेक्षा नसल्याची भावना व्यक्त केली होती.