‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं…?’ या एकमेव प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून बाहुबलीचे कट्टर चाहते दोन वर्षे प्रतीक्षा करत होते. आज ‘बाहुबली २’ प्रदर्शितही झाला. हे उत्तर मिळवण्यासाठी पहिल्या शोपासून प्रेक्षकांच्या रांगा चित्रपटगृहाबाहेर लागल्या होत्या. अखेरिस काही लोकांना हे उत्तर मिळालंही. राजामौली दिग्दर्शित या सिनेमात ३ तासांच्या मनोरंजनासाठी जे जे हवं असतं ते सगळं काही मिळेल. भव्य सेट, एक राजा, एक राणी, त्यांची प्रेमकहाणी, राजगादीसाठी केलेले राजकारण आणि त्यात भरडली जाणारी जनता, एका आईचं मुलासाठी तुटणारं हृदय असं सर्वकाही या सिनेमात आहे.

दाक्षिणात्य सिनेमा म्हटलं की त्यात अतिशयोक्ती ही आलीच. त्याला ‘बाहुबली’ तरी कसा अपवाद असेल. बाहुबलीच्या (प्रभास) एण्ट्रीपासून जी अतिशयोक्ती सुरू होते ती सिनेमाच्या शेवटच्या लढाईपर्यंत तशीच राहते. पण हा सिनेमा बघायला गेलेला प्रेक्षकही यासाठी मनाची तयारी करून आलेला असतो त्यामुळे तो ते सगळे सीन एन्जॉय करताना दिसतो. कलाकारांची वेशभूषा, अलंकार त्यांचा राजेशाही थाट आणि या थाटात सराईताप्रमाणे असणारा कलाकारांचा वावर अतिशय सुरेख आहे.

अमरेंद्र बाहुबली आणि देवसेना यांच्यात प्रेम कसे फुलत जाते आणि कटप्पाची त्याला कशी मदत होते हा सीन हसवणारा आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरही किती मेहनत घेतली गेली आहे हे बाहुबलीचे काही अफलातून सीन पाहताना प्रकर्षाने जाणवते. असे असले तरी ग्राफिक्सच्या चुका नजरेतून निसटत नाहीत. सिनेमात वीएफएक्सचा भरमसाट मारा असला असं वाटत असलं तरीही त्या दृश्यांसाठी त्याची गरज होतीच ही बाबही नाकारता येत नाही. या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू कोणती असेल तर ती म्हणजे एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफी. काही सीन इतके उत्कृष्टपणे चित्रीत आणि एडिट केले आहेत की ते दृश्य बघताना ‘वाह..’ म्हटल्याशिवाय राहवत नाही.

प्रभासने खूप मेहनत घेऊन शिव आणि बाहुबली साकारले आहेत. प्रभासशिवाय लक्षात राहते ती राजमाता शिवगामी अर्थात रम्या कृष्णन. राजमाता कशी असावी याचा उत्तम दाखला तिच्याकडे पाहून पुढे देता येईल असाच अभिनय तिने केला आहे. राणा डग्गुबतीनेही भल्लालदेवची व्यक्तिरेखा सुरेखरित्या निभावली आहे. कोणत्याही व्यक्तिरेखेची तुलना दुसऱ्याशी करता येणार नाही हेच खरं ‘बाहुबली’ सिनेमाचे यश आहे. पण तरीही संपूर्ण सिनेमात फक्त प्रभास आणि प्रभासच दिसतो. प्रभासच्या एण्ट्रीला टाळ्या पडणार नाहीत असं एकही थिएटर नसेल. तो करत असलेल्या गोष्टी केवळ अशक्य आहेत हे माहिती असूनही प्रेक्षकांमधला एखादा तरी शिट्टी वाजवतो, हे या सिनेमाचे यश म्हणायला हवे. अख्खं झाड उपटून काढणं, भला मोठा दगडी घोडा हाताने मोडून काढणं, झाडावर चढून ते एका बाजूला कलंडवणं या सगळ्या गोष्टी बुद्धीला पटणाऱ्या नसल्या तरी दाक्षिणात्य सिनेमांची ती ओळखच आहे. त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच हे सीन खास तयार करण्यात आले आहेत हे लक्षात येतं. शेवटची लढाई तर हास्यास्पदच आहे. ती बघताना जेवढी मजा येते तेवढंच असं कसं कोण करू शकतो हा विचारही प्रेक्षकांच्या मनात येतो.

सिनेमा जेवढा चांगला वाटेल तेवढीच वाईट त्यातील गाणी वाटतील. एकही गाणं लक्षात राहील असं नाही. शिवाय गाण्यांमुळे पुढे काय होणार ही उत्सुकता निघून जाऊन सिनेमा कंटाळवाणा वाटू लागतो. ‘अमरेंद्र बाहुबली’ आणि ‘देवसेना’ यांच्यात बहरणारं प्रेम, साम्राज्यासाठी होणारी कटकारस्थानं आणि एकंदर कलाकारांचे ताकदीचे अभिनय पाहता राजामौलींना हे समीकरण चांगलच जमलंय याची अनुभूती सिनेमा पाहताना वारंवार होते. पहिला संपूर्ण भाग हा अमरेंद्र बाहुबलीवर लक्ष केंद्रित करतो. उत्तरार्धाचाही काही भाग हा अमरेंद्रवर केंद्रित करण्यात आला आहे. संपूर्ण गोष्ट सांगताना राजामौलींनी वेळेचं कोणतंही बंधन ठेवलेलं नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेची बाजू काय आहे हे कळत जाते. ३ तासांच्या या सिनेमात गाण्यांमुळे कंटाळा आला तरी त्याची उणीव नंतरची कथा भरून काढते.

अचानक राजमाता शिवगामीने (रम्या कृष्णन) माहिष्मतीच्या साम्राज्याची धुरा सांभाळण्यासाठी बाहुबलीची (प्रभास) निवड न करता भल्लालदेवची (राणा डग्गुबती) निवड का केली असावी. आणि मग नेमकं ‘बाहुबली’च्या जीवनात काय घडलं? अमरेंद्र बाहुबलीला जे जमलं नाही ते महेंद्र बाहुबली शक्य करून दाखवू शकला का? कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं चित्रण ‘बाहुबली २’ मध्ये करण्यात आलं आहे. सिनेमा संपताना कदाचित ‘बाहुबली ३’ ही येऊ शकतो याची पुसटशी कल्पना राजामौली द्यायला विसरले नाहीत. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये राजामौलींनी ‘बाहुबली ३’ ची घोषणा केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका… कारण शिव के मन में क्या है वो कोई नहीं जानता…

मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com