एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’मुळे दोन स्टार लोकप्रिय झाले. त्यापैकी एक म्हणजे त्यामध्ये भल्लालदेव ही भूमिका साकाराणारा राणा दग्गुबाती हा अभिनेता. दाक्षिणात्य चित्रपटात राणा हा लोकप्रिय असला तरी त्याला देशभरात ‘बाहुबली’मुळेच ओळख मिळाली. त्याआधी त्याने ‘दम मारो दम’सारख्या हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. पण ‘बाहुबली’मुळे त्याची प्रसिद्धी आणखी वाढली.
राणा दग्गुबाती सध्या पुन्हा चर्चेत आहे पण एक वेगळ्याच कारणामुळे. राणा दग्गुबाती आणि त्याचे वडील सुरेश बाबू यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप लावण्यात आल्याने ते दोघे सध्या चर्चेत आहेत. हैद्राबादमधील उद्योगपती प्रमोद कुमार यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रीपोर्टनुसार या दोघांच्या विरोधात केसही दाखल करण्यात आली आहे.
आणखी वाचा : “केवळ मजा म्हणून…” दारूच्या व्यसनाबद्दल जावेद अख्तर यांनी केला खुलासा
अभिनेता आणि त्याच्या वडिलांनी गुंडांच्या मदतीने एक प्रॉपर्टी रिकामी करून घेतल्याचा दावा प्रमोद कुमार यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी त्यांना धमकीदेखील दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. २०१४ मध्ये राणा आणि त्याच्या वडिलांनी हैद्राबादच्या फिल्म सिटी परिसरातील त्यांची एक जमीन प्रमोद कुमार यांना हॉटेलसाठी भाड्यावर दिली होती. आता ती जमीन राणा आणि त्याचे वडील सुरेश बाबू विकणार असून त्यांनी यासाठी प्रमोद कुमार यांना ५ कोटी रक्कम भरपाई म्हणूनही दिले आहेत. यानंतर प्रमोद कुमार यांनी जमीन सोडण्यास नकार दिला होता.
आता मात्र प्रमोद यांनी पोलिसात धाव घेतली आहे, शिवाय त्यांना कोणीतही भरपाई मिळाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय आता ही जमीन रिकामी करण्यासाठी अभिनेता आणि त्याचे वडील प्रमोद यांना धमकावत आहेत असं त्यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हंटलं आहे. त्यामुळेच आता प्रमोद यांनी थेट कोर्टात धाव घेतली असून या दोघांविरोधात केस दाखल केली आहे आणि लवकरच यावर सुनावणीदेखील होणार आहे. राणा नुकताच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात झळकला होता, लवकरच तो आता नेटफ्लिक्सच्या ‘राणा नायडू’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.