प्रेक्षकांच्या नाराजीची व सूचनांची दखल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामाजिक आशय असलेल्या ‘ख्वाडा’ला यश मिळाल्यानंतर त्याचे निर्माते व दिग्दर्शक भाऊराव क ऱ्हाडे यांच्या टीमचा बहुप्रतीक्षित ‘बबन’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला एकीकडे भरभरून प्रतिसाद मिळत असताना, शेवट मात्र प्रेक्षकांना रूचला नाही. विशेषत: महिला वर्गाकडून नाराजीचा सूर उमटला व त्याची दखल घेत चार दिवसानंतर चित्रपटातील शेवट बदलण्यात आला आहे. त्यासाठी सुरूवात व शेवटचे मिळून दहा मिनिटांचे प्रसंग चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहेत.

भाऊराव कऱ्हाडे यांचा ग्रामीण भागातील राजकारण आणि प्रेमकथेवर आधारित ‘बबन’ ३० मार्च २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटात असणारा शिव्यांचा भरणा खटकणारा असूनही ‘बबन’ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ‘बबन’साठी महत्त्वाचे ठरले. पहिल्या तीन दिवसातच प्रतिसाद वाढत असल्याचे पाहून ‘बबन’चे खेळ वाढवण्यात आले असून अगदी सकाळी नऊचा खेळही लावण्यात आला आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर शेवटाविषयी प्रेक्षकांचा नकारार्थी सूर व्यक्त होऊ लागला. शेवटावर ‘सैराट’ची छाप असल्याचे प्रेक्षक सांगू लागले. तसेच, संपूर्ण चित्रपट विनोदी असताना शेवट मात्र अतिशय दु:खद करण्यात आल्याने तो प्रेक्षकांना रूचला नाही. तशा प्रतिक्रिया व सूचनांचा ओघ सुरू झाला. त्याची दखल टीम बबनने घेतली. त्यानुसार, चित्रपट सुरू झाल्यानंतरचा पहिला प्रसंग तसेच शेवटचा प्रसंग चित्रपटातून काढून टाकण्यात आला.

यासंदर्भात, दिग्दर्शक भाऊराव क ऱ्हाडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आहे. सुरूवातीपासून चित्रपटाचा बाज विनोदी आहे. मात्र, शेवट जड आणि अंगावर आल्यासारखा वाटतो, अशा प्रतिक्रिया सातत्याने येत होत्या.

चित्रपटाचा शेवट म्हणून दोन प्रसंग चित्रित करून ठेवण्यात आले होते. त्यानुसार, पहिला शेवट न रूचल्याने दुसरा पर्यायी शेवट चित्रपटात समाविष्ट करण्यात आला असून तो प्रेक्षकांना आवडतो आहे.

‘बबन’ चित्रपट आवडत असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत. मात्र, शेवट न आवडल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून विशेषत: महिलांकडून आल्या. त्यानंतर शेवट बदलण्यात आला आहे.

भाऊराव क ऱ्हाडे, दिग्दर्शक

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baban marathi movie end change