बॉलिवूडच्या मोठय़ा पडद्यावरील किंवा दूरचित्रवाहिन्याच्या छोटय़ा पडद्यावरील बरेचसे हिंदी भाषक कलाकार आता मराठीत काम करताना पाहायला मिळत आहेत. हिंदी कलाकारांनी मराठीत काम करणे हे आता प्रेक्षकानाही ओळखीचे झाले आहे. बॉलिवूडच्या ‘बिग बी’ पासून ते सलमान खानपर्यंत अनेकांनी मराठी चित्रपटात काम केले आहे. आता यात छोटय़ा पडद्यावरील मुनमुन दत्ता या नावाची भर पडली आहे. मुनमुन दत्ता यांची भूमिका असलेला ‘ढिन्चॅक एन्टरप्राईज’हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.बॉलिवूडचे आकर्षण मराठी चित्रपटसृष्टीलाही आहे. चित्रपटाचे नाव व्हावे किंवा त्याला चांगली प्रसिद्धी मिळावी यासाठी या अगोदरही मराठी चित्रपटातून हिंदीतील बडय़ा कलाकारांना ‘पाहुणे कलाकार’ म्हणून का होईना घेण्यात आले आहे. निर्माती, अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांच्या बहुतांश चित्रपटात किमान एक तरी गाणे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आले आहे. ‘कुठं कुठं जायाचं हनीममुनला’ हे अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रीत झालेले गाणे आजही लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘आक्का’ या मराठी चित्रपटात काम केले होते. अभिनयाबरोबरच आता हिंदीतील काही मोठय़ा मंडळींनी मराठी चित्रपट निर्मितीलाही सुरुवात केली आहे.दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता आता ‘ढिन्चॅक एन्टरप्राईज’ च्या निमित्ताने मराठीत येत आहे. या चित्रपटात दत्ता ही एका ग्लमॅमरस प्राध्यापिकेच्या भूमिकेत आहे. चित्रपटात मनवा नाईक, भूषण प्रधान, खुर्शिद लॉयर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मुनमुन दत्ता हिने मराठी भाषा शिकून घेतली आहे. मुनमुन दत्ता हिच्याप्रमाणेच चित्रपटातील काही गाणी हिंदीतील मिकासिंह, हर्षदिप कौर, पापोन यांनी गायली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा