अभिनेता आयुषमान खुरानासाठी हे वर्ष अत्यंत आनंददायी ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एकापाठोपाठ त्याचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरत आहेत. प्रेक्षक- समीक्षकांकडूनही त्याला दाद मिळत आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून श्रद्धा कपूर- राजकुमार रावच्या ‘स्त्री’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

प्रदर्शनाच्या दिवशी ‘बधाई हो’ या चित्रपटाने जवळपास ७.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आयुषमानच्या करिअरमधील हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर तीन दिवसांत कमाईचा आकडा ३१.४६ कोटी इतका झाला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुट्ट्यांचाही चांगला फायदा झाला आहे.

चित्रपटाने केलेली कमाई-

गुरुवार- ७.२९ कोटी रुपये
शुक्रवार- ११.६७ कोटी रुपये
शनिवार- १२.५० कोटी रुपये

प्रदर्शनानंतर लागोपाठ सुट्ट्या आल्याने रविवारच्या कमाईच्या आकड्याचा अंदाज लावल्यास एकूण कमाई सुमारे ४५ कोटींच्या घरात जाणार असल्याची शक्यता आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हा अंदाज वर्तवला आहे. केवळ भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियातही आयुषमानच्या या चित्रपटाने कमाल केली आहे.

वाचा : दीपिकासोबत या तारखेला होणार लग्न; रणवीरची ट्विटरवर घोषणा

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट खूपच साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. जीतेंद्र (गजराज राव) आणि प्रियंवदा कौशिकी (नीना गुप्ता) या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच सहजप्रेमाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या जोडप्याच्या संसारवेलीवर याच प्रेमामुळे तिसरे फूल उमलण्याची वेळ येते. मुलांसाठीही हा धक्का असतो आणि त्यांच्या आजीसाठीही हा तथाकथित सामाजिक चौकटीचा भंग असतो. एकूणच आपल्या दैनंदिन जगण्यात अशा अनेक विसंगती आहेत, ज्या लक्षात घेऊन आपण आपलेच नाही तर आपल्याबरोबरच्यांचेही जगणे सुंदर करू शकतो. पण लक्षात कोण घेतो? अशा परिस्थितीत ‘बधाई हो’सारखा अतिशय चांगला बदलत्या काळानुसार कौटुंबिक मूल्ये मांडणारा निखळ चित्रपट पर्वणी ठरतो.

Story img Loader