नीओ-न्वार या प्रकारातील चित्रपट सर्वसाधारणपणे गुन्हेगारी-सूड या प्रकारचे अधिक असतात. ‘बदलापूर’ हा हिंदी चित्रपट नीओ-न्वारच्या जवळ जाणारा, परंतु ‘देसी-न्वार’ प्रकारचा आणि सुडाचा थरारपट आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी उत्तम चित्रपट करतानाच ‘अॅण्टी-हिरो’ संकल्पना वेगळ्या रूपात मांडण्याचा झकास प्रयत्न केला आहे. वरूण धवनच्या कारकीर्दीतला महत्त्वाचे वळण ठरेल असा हा चित्रपट असून वरूण धवनने दिग्दर्शकाबरहुकूम अभिनय व सादरीकरण करण्यात यश मिळविले आहे. सबंध चित्रपट एक सुन्न करणारा, खिन्न करणारा पण थरारक अनुभव देतो.
चित्रपटाच्या शीर्षकावरूनच नायक खलनायकांचा सूड घेतो हे ध्वनीत होते. त्याचबरोबर शीर्षकातील ‘डोन्ट मिस द बिगनिंग’ ही ‘कॅचलाईन’ सिनेमा समजण्यासाठी महत्त्वाची आहे. चित्रपटाच्या पहिल्या चित्रचौकटीपासून ते शेवटापर्यंत खिळवून ठेवणारे एकामागून एक अनपेक्षित धक्का देणारे प्रसंग, कथानकाची वळणे आणि प्रेक्षकाला हिंदी चित्रपटाच्या रूढ कथनशैलीला छेद देण्याचा प्रयत्न करीत दिग्दर्शकाने श्वास रोखून धरणारा चित्रपट निर्माण केला आहे.
रघू हा पुण्यात राहणारा एक सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा प्रेमविवाह झालाय, त्याला एक छोटा मुलगा आहे. त्रिकोणी संसार सुखात चाललाय. एका बँकचोरीच्या घटनेत नकळतपणे रघूची बायको-मुलगा मारले जातात. त्यामुळे आयुष्य ३६० कोनांत बदलल्यानंतरचा झटका पचवत पचवत रघू २० वर्षांनी सूड घेतो.
रघूचा सुडाचा प्रवास दाखविताना लेखक-दिग्दर्शकांनी रघूच्या बायको-मुलाचे मारेकरी कोण आहेत ते प्रेक्षकांना दाखवीत असतानाच त्यांचा सूड मात्र रघू कसा घेणार याचा अंदाज बांधत चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना दिली आहे.
पहिल्या प्रदीर्घ दृश्यापासून प्रेक्षक श्वास रोखून धरत चित्रपट पाहायला सुरुवात करतो ते थेट शेवटपर्यंत.
सूड सूड म्हणजे शेवटी नायक म्हणजेच या चित्रपटातला ‘अॅण्टी हिरो’ काय सूड घेतो आणि त्याच्या हाती काय उरते आणि खलनायकांचे काय होते ते दाखविण्यातून दिग्दर्शकाने माणसाच्या मनाची खिन्नता गडद लाल रेघेसह अधोरेखित केली आहे.
बँकचोरीचे पहिले दृश्य, त्यानंतर दोन चोर रघुच्या बायकोसह तिच्या गाडीतून पलायन करतात, दरम्यान रघूची बायको-मुलगा मरतो आणि दोनापैकी एक चोर पलायन करण्यात यशस्वी होतो, दुसरा चोर पोलिसांनी शरण जातो. पोलीस त्याची रवानगी तुरुंगात करतात. चौकशीत तो चोर आपण रघुच्या बायकोला मारले नाही सांगत राहतो आणि पलायन केलेल्या चोराने मारल्याचे सांगतो. खरा खुनी कोण याचा शोध घेता घेता रघू कधी हताश होतो, कधी विकृत आनंदी होतो. रघूच्या भावनांशी समरस होत प्रेक्षकही कधी हताश होतो, कधी आनंदी होतो पण हे सारे खिन्नपणे होत राहते.
रघूचा सूड पूर्ण होतो का याची उत्सुकता प्रेक्षकाला लागून राहते खरी पण सूड पूर्ण झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न रघूला पडतो, एक विचित्र पोकळी निर्माण होते तसाच अनुभव प्रेक्षकालाही येतो.
आतापर्यंत तीन-चार चित्रपटांतील तरुण-तडफदार प्रेमी-चॉकलेट हिरोच्या प्रतिमेला छेद देत वरूण धवनने सूड भावनेने पेटलेला विक्षिप्त तरुण ‘अॅण्टी-हिरो’ साकारून अभिनेता आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
बँकचोरांच्या भूमिकेतील लियाक नवाझुद्दिन सिद्दिकी आणि हरमनच्या भूमिकेतील विनय पाठक यांनी आपल्या अभिनयाचे अनेक पैलू पुन्हा प्रेक्षकांसमोर आणले आहेत. तर वेश्येच्या भूमिकेतील हुमा कुरेशी, गुप्तहेराच्या भूमिकेतील अश्विनी काळसेकर, शोभा या तुरुंगातील कैद्यांसाठी काम करणाऱ्या मानवतावादी संघटनेच्या कार्यकर्तीच्या भूमिकेतील दिव्या दत्ता यांनी उत्तम अभिनयाने दिग्दर्शकाला साथ दिली आहे.
‘एक हसीना थी’ या पहिल्या चित्रपटापेक्षाही अधिक थरारक, सुन्न करणारा अनुभव दिग्दर्शक श्रीराम राघवनने या चौथ्या चित्रपटातून दिला आहे.
बदलापूर
निर्माते – दिनेश विजन सुनील लुल्ला.
दिग्दर्शक – श्रीराम राघवन.
लेखक – अरिजित बिस्वास, श्रीराम राघवन.
छायालेखक – अनिल मेहता.
संकलक – पूजा लाढा सूरती.
संगीतकार – सचिन-जिगर.
कलावंत – वरूण धवन, राधिका आपटे, नवाझुद्दिन सिद्दिकी, हुमा कुरेशी, यामि गौतम, विनय पाठक, दिव्या दत्ता, प्रतिमा कन्नन, कुमूद मिश्रा व अन्य.
-सुनील नांदगावकर