फिल्मफेअर पुरस्काराला गवसणी घातल्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांच्या याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलिया लवकरच ‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रटात ती अभिनेता वरुण धवन सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि ट्रेलरने अनेकांच्या मनावर छाप पाडली असताना आता चित्रपटातील आणखी एक गाणे तुमचे पाय थिरकवण्यासाठी सज्ज झाले आहे. ९० च्या दशकातील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे एका नव्या अंदाजात ‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकणार असल्याचेच चित्र दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या चित्रपटासाठी ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे एका नव्या अंदाजात रिक्रिएट करण्यात आले आहे. तनिष्क बागचीने हे गाणे रिक्रिएट केले असून रॅपर बादशाहाच्या रॅपचा सुरेख तडकाही या गाण्याला देण्यात आला आहे. या गाण्याची जास्त काही छेडछाड करण्यात आली नसली तरीही आलिया आणि वरुणच्या नृत्य शैलीमध्ये मात्र काही धम्माल स्टेप्स पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात पार्टी साँग्सच्या यादीत ‘तम्मा तम्मा लोगे’ या गाण्याचं हे रिक्रिएटेड व्हर्जन लवकरच समाविष्ट होईल यात शंकाच नाही. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे तेव्हा प्रचंड गाजले होते. आजही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग असलेले हे हटके गाणे अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहिरी यांनी गायले होते. माधुरी दिक्षित आणि संजय दत्त यांच्या हटके नृत्य शैलीने तर अनेकांनाच वेड लावले होते.

‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. २०१४ मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरुणाईने हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाबाबतही तरुणाईमध्ये उत्सुकता नक्कीच असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याआधी आलिया, वरुणने ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’, ‘हम्टी शर्मा की दुन्हनियां’ या चित्रपटांद्वारे स्क्रिन शेअर केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badrinath ki dulhania new song tamma tamma again released