बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट ही नव्या दमाची जोडी आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर आता अखिल सचदेवा याने गायलेले हमसफर हे गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे.
एक बॉलिवूड मसाला सिनेमा असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचा भरणा आहे. ‘तम्मा तम्मा’ या उडत्या गाण्यानंतर आता हमसफर हे गाणे मनाला भावणारे असेच आहे. अखिल सचदेवा यानेच हे गाणे स्वरबद्ध केले असून गायलेही आहे. बद्रीनाथ की.. या सिनेमातील ‘बद्रीनाथ की दुल्हनीया’ आणि ‘तम्मा तम्मा’ ही दोन्ही गाणी बादशाहने रॅप केली होती. पण ‘हमसफर’ हे गाणे सौम्य धाटणीचे आहे. या गाण्यातून वरुण आणि आलियाची केमिस्ट्री दिसून येते.
सिनेमात वरुण धवनचे नाव बद्रीनाथ उर्फ बद्री असे असते. बद्रीच्या प्रेमाचे वय सरलेले असते त्यामुळे त्याला आता सरळ लग्नच करायचे असते. पण आलिया मात्र त्याला लग्नासाठी नकार देते. यामुळेच या सिनेमात आलियाला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी वरुणने केलेली धडपड सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वरुणला फारसे महत्त्व न देणारी आलिया नेहमीप्रमाणे स्क्रीनवर खुलून दिसते. तिची स्टाइलही हटके आहे. त्यामुळे आलियाला देखील सिनेमाकडून अधिक अपेक्षा निश्चितच असतील.
काही दिवसांपूर्वी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाच्या पहिल्या टिझरमध्ये अभिनेता वरुण धवनचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले होते. या ट्रेलरमधील वरुणचे रुप पाहिले तर ते कोणत्याही सर्वसामान्य मुलाप्रमाणेच दिसले होते. कोणत्याही हिरोची, विनोदी कलाकाराची झलक त्याच्या या नव्या लूकमधून पाहायला मिळत नाहीये. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. २०१४ मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरुणाईने हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. त्यामुळे या सिनेमाबाबतही तरुणाईमध्ये उत्सुकता नक्कीच असेल.