या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट बाहुबली २ ने प्रदर्शनापूर्वीच एक विक्रम रचला आहे. ‘बाहुबली’ २ ने ऑनलाइन तिकिट विक्रीमध्ये आमिर खानच्या ‘दंगल’चा विक्रम मोडला असल्याची माहिती ‘बुक माय शो’ या ऑनलाइन तिकिट विक्री करणाऱ्या वेबसाइटने दिली. तिकिट विक्री सुरू झाल्यापासून केवळ २४ तासांच्या आत बाहुबली-२ च्या १० लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली असल्याचे बुक माय शो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
‘बाहुबली-२’ ने अॅडव्हांस बुकिंगचा विक्रम मोडल्याची माहिती ‘बुक माय शो’चे सीओओ आशिश सक्सेना यांनी दिली. ‘बाहुबली’ हा चित्रपट केवळ दाक्षिणेतील राज्यातच नाही तर सर्व देशात लोकप्रिय आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता होती. त्यामुळेच या चित्रपटाने हा विक्रम रचला असे सक्सेना यांनी म्हटले.
कटप्पाने बाहुबलीला का ठार मारले हा प्रश्न गेल्या वर्षी सर्वाधिक चर्चेमध्ये होता. सर्व जण या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची आतुरतेनी वाट पाहत आहेत. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून सोशल मिडियावर याच प्रश्नाची सर्वाधिक चर्चा होती. त्यामुळे बहुतेक प्रेक्षक हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणे पसंत करतील असे देखील म्हटले जात आहे. हा चित्रपट १००० कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. प्रभास आणि राणा या दोन अभिनेत्यांची भूमिका असलेल्या चित्रपट भारतातील सर्व भागातील प्रेक्षकांनी स्वीकारले आहे.
‘बाहुबली २’ हा सिनेमा बघण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरपासून ते या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्टीने अनेकांचेच लक्ष वेधले.
एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ हा सिनेमा जगभरात सुमारे ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतात जवळपास ६५०० स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. त्यामुळे तिकीट बारीवरचा गल्ला कमवण्यातही बाहुबली २ नंबर एक बनेल यात काही शंका नाही. अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणारा हा सिनेमा २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.