एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कनक्लूजन’ या दोन्ही चित्रपटानंतर अभिनेता प्रभास प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. एका रात्रीत प्रभासने लोकप्रियतेचा शिखर गाठला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आकडा काय असेल हे नव्याने सांगायला नको. ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’च्या यादीत त्याचं नाव सध्या अग्रस्थानी आहे. त्यामुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य, त्याच्या आवडीनिवडी, तो लग्न कधी करणार, किंबहुना त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अखेर त्याच्या लग्नाबद्दल त्याची बहिण प्रगतीने नुकताच एक खुलासा केलाय.
काही दिवसांपूर्वी प्रभास एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलीशी लग्न करणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. त्याचप्रमाणे त्याची ऑनस्क्रीन जोडीदार अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत अफेअरचीही चर्चा होती. बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी ही जोडी खऱ्या अर्थाने ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनुष्का आणि प्रभासमध्ये जवळीक वाढली असून, ते रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जाऊ लागलं होतं. नंतर या चर्चाही पोकळ ठरल्या. त्यामुळे तो नेमकं लग्न करणार तरी कधी आणि कोणासोबत करणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय.
वाचा : अनुष्कासोबतच्या नात्याविषयी प्रभास म्हणतो…
‘इंडिया डॉट कॉम’ या वेबसाइटने यासंदर्भात प्रभासची बहिण प्रगती हिच्याशी चर्चा केली. यावेळी प्रगती म्हणाली, ‘प्रभासच्या लग्नाविषयी आम्हीसुद्धा खूप उत्सुक आहोत आणि साहजिकच आम्हा सगळ्यांना त्या क्षणाचा आनंद लुटायला मिळेल.’ त्याचप्रमाणे प्रभास सध्या त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून लग्नाचा विचार इतक्यात करणार नसल्याचंही प्रगतीशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झालं. त्यामुळे हा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ लग्नबंधनात कधी अडकतोय हे तर येत्या काळातच स्पष्ट होईल.