आज दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहेत. याची सुरुवात एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटापासून झाली. आज दाक्षिणात्य चित्रपट एवढा वरचढ ठरला आहे, त्याचा पाया ‘बाहुबली’नेच रचला होता. आज ‘बाहुबली’चे रेकॉर्ड बऱ्याच चित्रपटांनी मोडले असले तरी या चित्रपटाची सर आणखी कशालाच आलेली नाही. या चित्रपटाची कथा राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती.
विजयेंद्र प्रसाद यांनी राजामौली यांच्या यावर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचीही कथा लिहिली आहे.याबरोबर सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचीही पटकथा त्यांनीच लिहिली होती. याबरोबरच राजामौली यांच्या ‘मगधीरा’ या चित्रपटासाठीही त्यांनीच कथा लिहिली होती. विजयेंद्र प्रसाद यांनी नुकतंच गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. शिवाय चित्रपट लेखनासंदर्भात एक कार्यशाळाही त्यांनी घेतली.
यादरम्यान विजयेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या लिखाणाच्या अनुभवाबद्दल आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दल भाष्य केलं आहे. शिवाय या क्षेत्रात येण्याआधी विजयेंद्र प्रसाद यांनी शेतीसुद्धा केली होती आणि या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत केली होती याविषयीही त्यांनी खुलासा केला. कथा लिहिण्याबाबत विजयेंद्र म्हणाले, “कथा लिहायची म्हणजे तुम्हाला शून्यातून काहीतरी निर्माण करावं लागतं. जे सत्य आहे ते खोटं म्हणून दाखवावं लागतं. जो माणूस उत्तम पद्धतीने ही गोष्ट करू शकतो तो चांगला कथालेखक होऊ शकतो.”
आणखी वाचा : पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर, मुलाखतीदरम्यान सांगितलं कारण
याविषयी पुढे बोलताना विजयेंद्र प्रसाद यांनी मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “मी कथा लिहीत नाही, त्या चोरतो. गोष्टी या आपल्या आजूबाजूलाच असतात, मग त्या रामायण महाभारतसारख्या ऐतिहासिक कथा असोत किंवा सत्यघटना. या गोष्टी फक्त तुम्ही तुमच्या भाषेत मांडणं महत्त्वाचं आहे.” विजयेंद्र प्रसाद हे सध्या ‘आरआरआर’च्या दुसऱ्या भागावर काम करत आहेत. नुकतंच राजामौली यांनीदेखील याविषयी खुलासा केला होता.