विनोदी थरारपट या चित्रपट प्रकाराबरोबरच ‘रिव्हेंज कॉमेडी’ हा प्रकारही पाश्चात्य चित्रपटांमध्ये आहे. आता प्रथमच हा चित्रपट प्रकार बॉलीवूडमध्ये येणार आहे. ‘दसविदानिया’ आणि ‘चलो दिल्ली’ यांसारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर दिग्दर्शक शशांत शहा यांचा ‘बजाते रहो’  हा तिसरा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होत आहे. आधीच्या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही अभिनेता विनय पाठक प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. विनय पाठकसोबत रवी किशन, रणवीर शौरी, विशाखा सिंग, तुषार कपूर हे कलावंतही प्रमुख भूमिकेत दिसतील.
सज्जन माणसे अचानक एखाद्या ठगाच्या तावडीत सापडतात आणि नंतर त्या ठगाला धडा शिकविण्यासाठी स्वत:ही वाकडय़ा मार्गाने वाटचाल करतात आणि अखेरीस सत्याचाच विजय होतो पण सत्याचा विजय करण्यासाठी प्रमुख व्यक्तिरेखा कोणता मार्ग अवलंबतात, त्याचे परिणाम काय होतात, त्यातून काय धमाल उडते हा चित्रपटाचा विषय आहे. रूढार्थाने या चित्रपटाला नायक नसून तुषार कपूर, विनय पाठक, डॉली अहलुवालिया, रणवीर शौरी अशा चार कलावंतांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मुख्यत्वे दिल्लीतील छत्तरपूर परिसरात बहुतांशी चित्रीकरण झालेला हा चित्रपट असून समाजातील विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सर्वसामान्यांनी धरलेला वाईट मार्ग आणि हा वाईट मार्ग चोखाळताना त्यांची उडणारी त्रेधातिरपिट आणि त्यातून निर्माण झालेला विनोद अशा प्रकारचा हा चित्रपट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा