भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही आता नि:संकोचपणे आपल्या सार्वजनिक जीवनात बिनधास्तपणे एकत्र वावरताना दिसत आहेत. एफसी पुणे सिटी विरुद्ध एफसी गोवा यांच्यातील फूटबॉल सामना पाहण्यासाठी अनुष्का आणि विराट दोघेही एकत्रितरित्या उपस्थित होते.
क्रिकेट दौऱयाच्या ठीकाणी विराटच्या भेटीसाठी अनुष्का जाणे किंवा अनुष्काच्या भेटीसाठी चित्रीकरणाच्या सेटवर विराट येणे अशा भेटी-गाठींच्या चर्चा याआधी उघडकीस झाल्या असल्या तरी, विराट-अनुष्का यांनी आपले नाते आतापर्यंत पडद्याआड ठेवणेच पसंत केले होते. परंतु, यावेळी या दोघांनीही इतर स्टार जोडप्यांप्रमाणे कोणताही संकोच न बाळगता एकत्रितपणे सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावण्याचे धडे गिरविण्यास सुरूवात केलेली दिसते. एफसी गोवा या आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी विराट आला होता. स्टँड्समध्ये अनुष्का शर्मानेही विराटच्या संघाचा टी-शर्ट घालून त्याला सोबत दिली.
याआधी अनुष्का-विराटच्या भविष्याचा विचार करण्यासाठी दोन्ही कुटुंबियांची भेट झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्रितरित्या उपस्थिती लावण्याचा विराट-अनुष्काचा बिनधास्तपणा आणि दोन्ही कुटुंबियांच्या भेटीचे वृत्त हे या दोघांचे ‘बॅण्ड बाजा बारात’ होण्याची चाहुल तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader