‘बाजीराव मस्तानी’ या प्रेमपटासह हिंदी-मराठीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांचे छायाचित्रणकार महेश लिमये यांचे दिग्दर्शन असलेल्या नव्याकोऱ्या प्रेमपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. २०१४ साली ‘यलो’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या महेश लिमये यांनी पहिल्यांदाच ‘जग्गू आणि जुलिएट’ या प्रेमपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी छायाचित्रणकार म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे महेश लिमये जवळपास आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत आणि महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन अशी अनोखी भट्टी या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने जमून आली आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातून पुन्हा एकदा अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशूरामी ही कमाल जोडी प्रेक्षकांची मने जिंकायला येत आहे.
गेली अनेक वर्षे पर्यटनावर आधारित चित्रपट करावा अशी इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे लिमये सांगतात. ‘यलो’ चित्रपटाचा अनुभव वेगळा होता. त्याची कथा-संकल्पना आधीच तयार होती. मात्र, नव्याने कुठलीही चांगली गोष्ट मांडायला आणि प्रेक्षकांसमोर आणायला वेळ लागतो तसेच काहीसे ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाच्या बाबतीत झाल्याचे त्यांनी सांगितले. एकमेकांची साथ भावणाऱ्या दोन व्यक्तींभोवती या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. प्रेमकथेबरोबरच भावनांना स्पर्शून जाणाऱ्या या चित्रपटाशी सर्व वयोगटांतील प्रेक्षक जोडले जातील, अशी खात्रीही लिमये यांनी व्यक्त केली.
समाजातील वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणणाऱ्या मधुर भांडारकर यांच्यासोबत लिमयेंनी ‘कॉर्पोरेट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘फॅशन’ या चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे. याशिवाय रवी जाधव, प्रभुदेवा यांसारख्या दिग्गजांबरोबर छायाचित्रणकार म्हणून त्यांनी काम केले आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मोठय़ा कलावंतांसोबत काम करत असताना छायाचित्रणकार आणि स्वत: एक दिग्दर्शक म्हणून गेली अनेक वर्षे अभिनेता अमेय वाघसोबत काम करण्याची इच्छा होती, असे लिमये यांनी सांगितले. मराठी रंगभूमीवर आपली कला सादर करणारे कलाकार अभिनयात पारंगत असतात आणि त्यापैकीच एक अमेय वाघ असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटनिर्मिती करायचा म्हणजे अफाट खर्च आलाच. मराठी चित्रपट आणि खर्च यांचे समीकरण फार जुळत नाही असे काहीसे चित्र गेले अनेक वर्षे आपण पाहात आणि अनुभवत आहोत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास अठ्ठावीस वर्षे कार्यरत असलेल्या लिमयेंनी हिंदी चित्रपटांचा निर्मिती खर्च हा तुटपुंजा नसल्यामुळे हिंदी चित्रपट मोठे होतात, तर मराठी चित्रपट हे कमी खर्चात जरी तयार केले असले तरी मराठी कलाकारांमध्ये जी अभिनय कला आहे ती इतर कुठेही नाही, असे ते म्हणतात. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना भावणाऱ्या विषयांवरच चित्रपट करावा, असा निर्धार लिमये यांनी केला आहे.