वादांच्या लढाया लढत प्रदर्शनापूर्वीच गाजलेल्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाने प्रदर्शनानंतरची बॉक्स ऑफिसवरची लढाई गाजवली आहे. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आपली विजयी घोडदौड कायम ठेवत, केवळ नऊ दिवसांत शंभर कोटीचा पल्ला पार केला. बॉलिवूडचा ‘बादशहा’ अशी बिरुदावली मिरविणारा शाहरुख खान आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला ‘दिलवाले’सारखा चित्रपटासमोर आव्हान देत उभा असतानादेखील ‘बाजीराव-मस्तानी’ने बॉक्स ऑफिसवर उच्च कामगिरी केली. मिळकतीच्याबाबतीत काहीशी संथ सुरुवात केलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सातत्याने चढती कामगिरी नोंदवल्याचे पाहायला मिळाले. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात आलेल्या नाताळच्या सुटीचादेखील चित्रपटाला फायदा झाला. शुक्रवार २५ डिसेंबरचे ‘दिलवाले’ची मिळकत ८.११ कोटी इतकी नोंदवली गेली, तर ‘बाजीराव-मस्तानी’चे कलेक्शन १२.२५ कोटी इतके होते. शनिवारच्या उत्पन्नात घट झाली असली, तरी रविवारचे उत्पन्न हे शनिवारच्या उत्पन्नापेक्षा अधिक नोंदवले गेले. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाचे भारतातील उत्पन्न १२०.४५ कोटी इतके नोंदवले गेले आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्यातील चांगल्या कामगिरीमुळे ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांच्या उत्पन्नातील फरक कमी होत चालल्याचे चित्रपट व्यवसायचे समीक्षक तरण आदर्श यांनी टि्वटरवर म्हटले आहे. संजय लीला भन्साळींनी या चित्रपटाद्वारे उत्त्म कलाकृती सादर करून त्यांच्यातील कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. येणाऱ्या काळात चित्रपटाच्या उत्पन्नाचा आलेख हा चढताच राहील, असे भाकीत जाणकारांकडून वर्तवले जात आहे.

Story img Loader