मल्हारी गाण्यातील शब्द आणि नृत्यावर नेटकरींमध्ये तीव्र प्रतिक्रिया
संजय लिला भन्साळी निर्मित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाशी संबंधित वाद शमण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे या चित्रपटातील ‘पिंगा’ या गाण्यात बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी एकत्रितपणे नृत्य करताना दाखवण्यात आल्याने विरोधाचा सूर प्रखर झाला असतानाच, या चित्रपटातील दुसरे गाणेदेखील वादात सापडले आहे. ‘मल्हारी’ या गाण्यामध्ये ‘वाट लावली’ असे शब्द बाजीरावची भूमिका करणाऱ्या रणवीरच्या तोंडी दाखवण्यात आले आहेत. या गाण्याबद्दल अद्याप उघड प्रतिक्रिया येत नसल्या तरी फेसबुक, ट्विटर अशा समाजमाध्यमांवर मात्र नेटकरींनी भन्साळींना चांगलेच बोल लावले आहेत.
संजय लिला भनसाळी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘पिंगा’ या गाण्यात बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई जोशी आणि मस्तानी एकत्रपणे गाण्याच्या तालावर ठेका धरत असल्याचे दाखवण्यात आले. ‘पिंगा’ गाण्यातील या अजब दृश्याला आक्षेप घेत सर्व स्तरातून संजय लिला भनसाळी यांचा निषेध करण्यात आला. पिंगा गाण्याचा वाद संपतो ना संपतो तोवर आता चित्रपटातील ‘मल्हारी’ गाण्यामुळे या वादात आणखीन भर पडली आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील ‘मल्हारी’ या गाण्यात बाजीराव पेशवे आणि साथीदार विजयोत्सव साजरा करताना दाखविण्यात आले आहे. मल्हारी गाण्यात बाजीराव पेशवे अर्थात रणवीर सिंह हा ‘वाट लावली’ अशा अजब पंक्ती उच्चारताना दिसतो. विशेष म्हणजे, या गाण्यातील रणवीरचे नृत्य आधुनिक शैलीचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे आणि नृत्य टीकेचे धनी ठरत आहे.

Story img Loader