ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे सलमान खानला पुन्हा यशाचा हात दिला आहे. शुक्रवारी सुट्टीचा दिवस नसतानाही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २७.२५ कोटी रुपये कमाई करीत तिकीट बारीवर आपली चुणूक दाखवून दिली होती. याआधी सलमानच्याच ‘किक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती तो विक्रम ‘बजरंगी भाईजान’ने मोडला असून अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली आहे. शंभर कोटींची कमाई करणारा सलमानचा हा आठवा चित्रपट आहे.
सीमा ओलांडून करून आलेली एक छोटीशी पाकिस्तानी मुलगी आणि तिला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या पवन कुमार चतुर्वेदीची (सलमान खान) कथा लोकांच्या पसंतीस उतरली आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ला मिळालेली प्रसिद्धी ही प्रेक्षकांमुळे असल्याचे चित्रपट व्यापारविषयक विश्लेषकांनी म्हटले आहे. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी कौतुक केल्याने प्रेक्षकसंख्या वाढत गेल्याचे विश्लेषक कोमल नहाटा यांचे म्हणणे आहे. जगभरात एकूण ५ हजार चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवारी २७.२५ कोटी रुपये, शनिवारी ३६.६० कोटी रुपये तर रविवारी ३८.७५ कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण १०२.६० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांत या चित्रपटाने शंभर कोटींची विक्रमी कमाई के ली असून हा त्याचा ‘शंभर कोटी क्लब’मधला आठवा चित्रपट असल्याचे विश्लेषक तरण आनंद यांनी म्हटले आहे.
२००९ साली आलेल्या सलमानच्या ‘वाँटेड’ या चित्रपटाने त्याच्या कारकीर्दीची दिशाच बदलून टाकली. शंभर कोटी रुपये कमावणारा ‘वाँटेड’ हा सलमानचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘दबंग’, अनीस बाज्मीचा ‘रेडी’, अतुल अग्निहोत्रीची निर्मिती असलेला ‘बॉडीगार्ड’, अरबाझ खान दिग्दर्शित ‘दबंग २’, कबीर खानचा ‘एक था टायगर’ या एकापाठोपाठ एक आलेल्या चित्रपटांनी शंभर कोटींची कमाई केल्याने सलमान खान बॉक्स ऑफिसचा सुपरहिरो ठरला आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाने पहिल्यांदा दोनशे कोटींची कमाई करीत नवा विक्रम केला होता. त्यानंतर सोहैल खान दिग्दर्शित ‘जय हो’ याही चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी तो चित्रपट अनेक अर्थाने फसला होता. साजिद नाडियादवाला दिग्दर्शित ‘किक’ या चित्रपटानेही कमीत कमी दिवसांत शंभर कोटींचा आकडा पार केला होता. मात्र, तीन दिवसांत शंभर कोटी रुपये कमावण्याचा विक्रम ‘बजरंगी भाईजान’च्या नावावर नोंदला गेला आहे. सर्वाधिक शंभर कोटींचे चित्रपट देणारा सलमान खान हा बॉलीवूडचा एकमेव नायक ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा