बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला आणि अपक्षेप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यास सुरुवात केली. सलमानचा चित्रपट म्हणून लक्ष वेधून घेणाऱ्या या चित्रपटात मुक्या मुलीची भूमिका साकारणारी छोटी हर्षाली मल्होत्रादेखील चर्चेचा विषय झाली आहे. हर्षालीच्या भावपूर्ण अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनात घर केले आहे. मोठ्या पडद्यावर मुक्या मुलीची भूमिका साकारणारी हर्षाली प्रत्यक्षात मात्र खूप बडबडी असल्याचे तिच्या आईने सांगितले. ती कधीही शांत बसत नसल्याचे सांगत, कार्यशाळेदरम्यान तिला गप्प कसे बसवावे याची चिंता आपल्याला सतावत असल्याचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सांगितल्याची माहिती हर्षालीची आई काजल मल्होत्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. चित्रपटात भूमिका साकारल्याने तिच्यात कोणताही बदल झाला नसून, जशी ती पहिल्यांदा होती तशीच ती आजही असल्याचे त्या म्हणाल्या. लहान मुलांबरोबर काम करताना चित्रपटकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. याविषयीचा अनुभव कथन करताना हर्षालीची आई म्हणाली, चित्रपटात हाणामारीच्या अथवा मोठ्या आवाजाच्या दृश्यादरम्यान तिला भीती वाटे. परंतु सलमान खान आणि कबीर खान अन्य कलाकारांसह तिच्यासोबत खेळून तिची व्यवस्थित काळजी घेत असत. यामुळे ती चित्रीकरणात हळूहळू रुळू लागली.
हर्षालीवर कौतुकाचा वर्षाव होत असून, फराह खानने तिचा “the find of the century” असा उल्लेख करून विशेष कौतुक केले. चित्रपटात काम केल्यानंतर आता हर्षाली चांगलीच प्रसिद्ध झाली असली, तरी अभ्यास आणि अभिनयातला तिचा ताळमेळ सुरळीत राहील, यावर पालक म्हणून आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे तिच्या आईने सांगितले. हर्षालीने ‘कबूल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ सारख्या टीव्ही मालिकांमधून आणि जाहिरातींमधून अभिनय केला असला, तरी टीव्ही मालिकांना जास्त प्राधान्य देणार नसल्याचेदेखील त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा