पुणे शहराची शान मानल्या जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराला एक आधुनिक लूक देण्याचा विचार सध्या केला जात आहे. बालगंधर्व रंगमंदिर पूर्णपणे पाडून तिथे आंतरराष्टीय दर्जाच थिएटर उभारण्यात येणार असून यासाठी १० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. पु.ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून बालगंर्धव रंगमंदिराची वास्तू उभी राहिली. आता ५० वर्षांनंतर ही वास्तू पाडून नवीन इमारत बांधण्याची खरंच गरज आहे का असा सवाल रंगकर्मींकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा सांगणारी या तळमजल्याची आसनक्षमता ६६९ आहे तर बाल्कनीची आसनक्षमता ३२० आहे. १९६२ मध्ये संभाजी बागेच्या जागेत बालगंधर्व रंगमंदिर ही वास्तू उभारण्यात आली. पण आता ५० वर्षांनी ही वास्तू जुनी झाली असून ती पाडून नवीन वास्तू उभारण्याची गरज असल्याचे पालिकेला वाटते. म्हणूनच पालिकेने ही वास्तू पूर्णपणे पाडून नवीन वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काही कलाकारांनी वास्तू पाडण्यावर आक्षेप घेतल्यामुळे कलाकारांच्या सल्ल्यानेच नवीन वास्तूचा आराखडा तयार करण्यात येईल असे आश्वासन पालिकेने दिले आहे. पण खरंच ५० वर्षांमध्ये वास्तू पाडून नवीन उभारण्याची गरज आली होती का हा प्रश्न नाटकप्रेमींनाही पडला आहे.