टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ मधल्या ‘दादी सा’ म्हणजेच अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालंय. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. २०२० सालपासून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रासही सुरू झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी ७० ते ८० चं दशक आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवलं. छोट्या पडद्यावर कधी कडक शिस्तीची सासू तर मोठ्या पडद्यावर मायाळू सासूच्या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांना अभिनेत्री नव्हे तर पत्रकार बनायचं होतं, हे खूप कमी लोकांना माहित असेल. सोबतच बॉलिवूडमधील अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत एक अनोखं नातं सुद्धा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सुरेखा सिकरी या अमरोहा आणि नैनीतालमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मोठं झाल्यानंतर एक उत्तम पत्रकार बनण्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्या लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण कदाचित सुरेखा सिक्री यांच्या नशीबात काही दुसरंच लिहून ठेवलं होतं. अलिगढ मधल्या मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या कॉलेजमध्ये एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या नाटकाचं नाव होतं ‘द किंग लियर….’. हे नाटक पाहण्यासाठी सुरेखा सिक्री गेल्या होत्या. या नाटकाला पाहून त्या प्रभावित झाल्या आणि मोठं झाल्यानंतर पत्रकार बनण्याचं ध्येय बाजूला ठेवत अभिनयात करिअर करण्याचा विचार त्यांनी मनात पक्का केला.

(Photo-You Tube/colors tv)

त्या एका नाटकाला पाहून सुरेखा सिकरी यांनी अभिनयाला इतकं गांभिर्याने घेतलं की पुढे जाऊन त्यांनी एका नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं. पण यासाठी अर्ज भरण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती. त्यावेळी त्यांच्या आईंनी त्यांना धैर्य दिलं आणि आईच्या म्हणण्यावरून त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील प्रवेशाचा अर्ज भरला. यासाठी त्यांनी एक ऑडिशन दिलं होतं आणि १९६५ मध्ये त्यांची निवड सुद्धा झाली. १९७१ मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा स्कूलमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जवळजवळ १० वर्ष त्यांनी एका कंपनीच्या नाटकांमध्ये काम केलं. यानंतर त्यांच्या करिअरला वेगळं वळण लागलं आणि १९७८ साली रिलीज झालेल्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. यानंतर मात्र सुरेखा सिकरी यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर त्यांनी मुंबईतल्या मायानगरीत आपल्या स्वप्नातलं घर देखील खरेदी केलं.

५० वर्षानंतर मिळू लागली लोकप्रियता
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम करून सुद्धा त्यांनी हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. जवळजवळ ५० वर्षानंतर त्यांच्या नावाचा डंका घराघरात वाजू लागला. सुपरहिट मालिका ‘बालिका वधू’ मधून ‘दादी सा’ बनून त्या घराघरात पोहोचल्या. या मालिकेत झोक्यावर अगदी ऐटीत बसून त्यांच्या दमदार आवाजातील ते कडक डायलॉग्स प्रेक्षकांना भावले. या मालिकेतून त्या रातोरात स्टार बनल्या. आजही प्रेक्षक सुरेखा सिकरी यांना त्यांच्या स्वतःच्या नावापेक्षा जास्त ‘दादी सा’ नावाने ओळखतात.

नसीरूद्दीन शाह यांच्यासोबत होतं अनोखं नातं

तसं पहायलं गेलं तर बॉलिवूडमधल्या स्टार्सच्या नात्यांबद्दल मोठा गोंधळ असतोच. पण तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य वाटेल, सुरेखा सिकरी या बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मेव्हणी होत्या. अभिनेते नसरूद्दीन शाह यांना एक मुलगी आहे. हिबा शाह असं  त्यांच्या मुलीचं नाव आहे. ती सुद्धा एक अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे सुरेखा सिकरी यांच्याच ‘बालिका वधू’ मालिकेत त्यांच्या तरूणपणातील भूमिका साकारली होती.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balika vadhu fame actress surekha sikri life unknown facts prp 93