स्वप्निल घंगाळे

भारताने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. या निर्णयाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. याआधी चित्रपट असोत वा वेबसीरिज त्यातून काश्मीर हा विषय वारंवार दिसून यायचा. या निर्णयानंतर प्रदर्शित झालेल्या दोन महत्त्वाच्या वेबसीरिजमध्ये बलुचिस्तानचा उल्लेख प्रामुख्याने के ला जात असल्याचे जाणवते. याच पार्श्वभूमीवर बलुचिस्तान आणि बॉलीवूडमधील संबंधांवर टाकलेली नजर..

काही दशकांपूर्वी टीव्हीचा जमाना होता, त्यानंतर त्याची जागा सिनेमांनी घेतली. त्यानंतर आता सिनेमांची जागा इंटरनेटवरील वेबसीरिजने घेतली आहे. वेबसीरिजला सेन्सॉरचे बंधन नसल्याने या माध्यमातून अधिक मोकळेपणे भावना आणि विषय मांडले जातात. म्हणूनच की काय भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर बलुचिस्तानचा उल्लेख सलग दोन प्रमुख वेबसीरिजमध्ये वारंवार होत असल्याचे पाहायला मिळाले. यामधील पहिली सीरिज ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील ‘द फॅमिली मॅन’ आणि दुसरी सीरिज म्हणजे ‘नेटफ्लिक्स’वर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘बार्ड ऑफ ब्लड.’ दोन्ही सीरिज या देशाची सुरक्षा आणि गुप्तपणे देशविरोधी कारवाया थांबवण्यासाठी लढणारे गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी या विषयांभोवती फिरताना दिसतात. महिन्याभराच्या कालावधीत प्रदर्शित झालेल्या दोन्ही सीरिजमध्ये बलुचिस्तानचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला आहे.  काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताने बलुचिस्तानलाही पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करावी या मागणीसाठी ‘फ्री बलुचिस्तान’ मोहिमेचे अनेक कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत. असं असतानाच याच परिसरामधून भारताविरुद्ध कारवाया रचल्या जात असल्याची कथा सांगणाऱ्या दोन सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. अर्थात या मालिका सत्यघटनेवर आधारित आहेत, असं निर्मात्यांनी कुठेही नमूद केलेलं नाही. तरी कलम ३७०च्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानचा होणारा उल्लेख लक्षात घ्यावासा वाटतो.

भारत विरुद्ध पाकिस्तान या विषयांवर आधारलेले अनेक सिनेमे आतापर्यंत बॉलीवूडमध्ये पाहायला मिळाले आहेत. मात्र आता भारताने कलम ३७० रद्द के ल्यानंतर बलुचिस्तानी लोकांकडून त्यांच्या स्वातंत्र्य लढय़ात भारताने मदत करावी, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काही वर्षांपूर्वी लाल किल्लय़ावरून दिलेल्या भाषणामध्ये बलुचिस्तान मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी उपस्थित केला जावा, असं मत व्यक्त के लं होतं. या सर्व जुन्या नव्या संदर्भासहित आता हळूहळू पाकिस्तानविरुद्ध युद्ध दाखवणाऱ्या बडय़ा पडद्यावर सातत्याने बलुचिस्तानचा उल्लेख होत राहिला तर आश्चर्य वाटायला नको. आगामी काळात ‘बालाकोट हवाई हल्ला’, ‘कलम ३७०’ यासारख्या विषयांवर अनेकांनी सिनेमांच्या नावांची नोंदणी करून ठेवली आहे. त्यामुळे या सिनेमांमध्येही बलुचिस्तानचा संदर्भ नक्कीच असणार आणि तो पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर दिसणार अशी शक्यता नकारता येत नाही.

दरम्यान बलुचिस्तानचा संदर्भ सध्या वेबसीरिजमध्ये दिसत असला, तरी हा प्रांत स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचाच भाग होता. येथील संस्कृती, समाज, परंपरा अनेक गोष्टी या भारतातील सध्याच्या पंजाब प्रांताप्रमाणेच आहेत. त्यामुळेच भारत स्वतंत्र होऊ न पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा या भागातील अनेकांनी भारतात स्थलांतर केले. यामधील काही जणांनी पुढे हिंदी सिनेमामध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले. मूळचे बलुचिस्तानचे असणारे चार महत्त्वाचे चेहरे म्हणजे कादर खान, राजकुमार, अमजद खान आणि सुरेश ओबेरॉय. हे चौघेही जण बलुचिस्तानमध्ये जन्मलेले असून या प्रांताशी चौघांचे विशेष नाते आहे.

याच वर्षी निधन झालेले ज्येष्ठ विनोदी अभिनेते कादर खान यांचा जन्म १९३७ साली पिशिन या बलुचिस्तानमधील प्रांतात झाला. त्यांचे वडील अफगाणिस्तानमधील होते, तर आई ही मूळची बलुचिस्तानमधील होती. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपणातील बराचसा काळ बलुचिस्तानमध्येच गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात हा प्रदेश भारताचाच भाग होता. फाळणीच्या वेळी कादर खान यांचे वडील मुंबईला आले. त्यांच्या याच निर्णयामुळे हिंदी सिनेसृष्टीला एक उत्तम विनोदी अभिनेता लाभला. हिंदी सिनेसृष्टीतील आणखीन एक महत्त्वाचे आणि अजरामर नाव म्हणजे राजकुमार. राजकुमार हेही मूळचे बलुचिस्तानमधील. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानमधील लोरालाई येथे झाला होता. नंतर ते नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले आणि इथलेच होऊ न गेले.

बलुचिस्तानशी नातं सांगणारं तिसरं मोठं नाव आहे हिंदी सिनेसृष्टीमध्ये गब्बर सिंग नावाचा खलनायक अजरामर करणारा चेहरा अर्थात अमजद खान. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४० रोजी क्वेट्टा येथे झाला. फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब भारतामध्ये स्थायिक झाले होते. सध्या हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असणारे सुरेश ओबेरॉय हेही मूळचे बलुचिस्तानमधलेच. त्यांचा जन्मही क्वेट्टा येथेच झाला होता. नुकताच त्यांची निर्मिती असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील जीवनपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली होती. याशिवाय वीणा मूळ नाव ताजोर सुल्ताना तसेच ‘हीना’ या सिनेमामधील अभिनेत्री झेबा बख्तियार याही दोघी मूळच्या बलुचिस्तानच्याच. त्यामुळेच बलुचिस्तान आणि हिंदी सिनेसृष्टीचे नाते तसे जुनेच आहे. मात्र हे पडद्यामागील नाते आता हळूहळू पडद्यावरून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पुढे येताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

बलुचिस्तान नक्की आहे तरी कसा?

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील एक प्रांत असून हिंसाचारामुळे चर्चेत आहे. फाळणीपासून म्हणजेच १९४७ पासूनच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी तेथील जनतेतून केली जात आहे. ११ ऑगस्ट १९४७ रोजी आम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आम्ही भारताशी जोडले गेलेलो असून पाकिस्तानच्या जोखडातून बलुचिस्तानला स्वतंत्र करायचे आहे. त्यामुळे भारताने मदत करावी, अशी मागणी ‘फ्री बलुचिस्तान’  मोहिमेतील कार्यकर्ते वारंवार करत असतात. बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या ४ प्रांतांपैकी आकाराने सगळ्यात मोठा प्रांत. पाकिस्तानचा ४४ टक्के भूभाग बलुचिस्तानकडे आहे. पंजाब, सिंध, अफगाणिस्तान आणि इराण यांच्याशी बलुचिस्तानच्या सीमा जोडलेल्या आहेत आणि पाकिस्तानच्या दृष्टीने सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे ग्वादार बंदर बलुचिस्तानमध्ये आहे. नैसर्गिक वायू, तेल, तांबे, सोने अशा साधनसंपत्तीने बलुचिस्तान समृद्ध आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ७ टक्के लोक बलुचिस्तानमध्ये राहातात. त्यापैकी बलुच बहुसंख्य आहेत तर उर्वरित पश्तून आणि ब्राहुई जमातीचे आहेत. नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही बलुचिस्तान पाकिस्तानमधील अत्यंत मागासलेला प्रांत आहे. त्यामुळेच पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून या प्रांतातील लोक स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत असून असे झाल्यास आम्हाला आमचा विकास साधता येईल, असं स्थानिक बलुची लोकांचे म्हणणे आहे.