भारतात कित्येक मसाला सिनेमांचा अंत हा कलात्मक सिनेमांचा आरंभ बनला आहे.  लग्न होण्यात खलनायकाने उभ्या केलेल्या किंवा तो नसल्यास नियती नामक फेऱ्यात अडकून सतराशे साठ अडचणी सोडवण्यात गढलेल्या नायक आणि नायिकांच्या सहगानाच्या गोष्टीच बहुतांश चित्रपटांतून भारतीय प्रेक्षकांना अनुभवाव्या लागल्या आहेत. इथल्या लेखक-दिग्दर्शकांचे कौशल्य सगळे रस एका दोन अडीच तासांच्या चित्रपटांमध्ये कोंबण्यामध्ये जाते. अन् काम करणारे अभिनेते सुपरस्टार असले, तर दिग्दर्शकांना कौशल्याचीही गरज नसते. कारण त्या स्टार्सना पाहण्यासाठी आपोआप दर्दी फॅन्स चित्रपटगृहाला तुडुंब करून टाकते. भारतासोबत जगभरच्या रोमॅण्टिक-कॉमेडी चित्रपटांची सुखांतिका ही एखाद्या ‘व्हिडीओगेम’च्या वळणाची असते. ‘अंति विजयी ठरो आणि एकदाचे लग्न घडो’ या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींच्या टप्प्यांची मालिका सोडविण्याचे महत्कार्य चित्रकर्त्यांना प्रेक्षकांसमोर उभे करावे लागते.

झोई-लिस्टर जोन्स या लेखिका, दिग्दर्शिका आणि प्रमुख अभिनेत्रीच्या ‘बॅण्ड-एड’ या चित्रपटामध्ये रोमॅण्टिक कॉमेडीची वर सांगितलेली पारंपरिक वळणे भेटत नाहीत. इथे खलनायकाचे अस्तित्वच नाही. त्यामुळे इथला नायक हा नायिकेला बृहद् संकटातून सोडविण्यासाठी दहा-एक जणांना नामोहरम करण्याची क्षमता असणारा आहे की नाही, हे कळू शकत नाही. मात्र घरातील नोकरी करण्याची जबाबदारी एकटय़ाने स्वीकारणाऱ्या नायिकेवर बेसिनमध्ये विसळून ठेवायच्या भांडय़ांची संख्या वाढत जाण्याच्या संकटातून नायक सुटका करू शकत नाही. परिणामी घासायच्या भांडय़ांवरून सुरू होणारे भांडण विविध वळणांनी एकमेकांवर शाब्दिक कुरघोडीच्या नवनव्या शक्यता तयार करत जाते आणि चित्रपट लग्नारंभीच्या वर्षांत दोन व्यक्तींच्या एकमेकांना समजून घेण्यातील संघर्षांचे वैश्विक वास्तव समोर आणतो.

चित्रपटाला सुरुवात होते ती अ‍ॅना (झोई-लिस्टर जोन्स) आणि बेन (अ‍ॅडम पॅली) या दोन अतिसमंजस व्यक्तींच्या लग्नानंतरच्या बऱ्याच महिन्यांनंतरच्या एका सुप्रभातीने. अ‍ॅना हिला लेखिका बनायचे आहे. मात्र तिच्या पुस्तकाचे हस्तलिखित अद्याप प्रकाशकांकडे विचारार्थ आहे. तिच्या संभाव्य बेस्टसेलरचे प्रकाशनच न झाल्यामुळे चरितार्थासाठी तिला उबर सेवेत गाडी चालवावी लागत आहे. बेन हा चित्रकार कलावंत असला तरी कल्पकतेच्या कफल्लकतेने त्याला ग्रासले आहे. दोघांमध्ये वाढत्या कुरबुरीचे कारण अ‍ॅनाचा काही महिन्यांपूर्वी झालेला गर्भपात असल्याचे पुढे स्पष्ट होते. पण भांडणाला आवर काही घातला जात नाही. ते छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा बाऊ करीत एकमेकांच्या पाणउतारा करण्याच्या संधी शोधू लागतात. एकेकाळी वठविलेल्या प्रेमाच्या अंकुराचा विषवृक्ष बनण्याआधी ते समुपदेशकाचा सल्ला घेण्यासाठी जातात आणि तेथेच भांडणाचे प्रात्यक्षिक दाखवितात. समवयस्कांत मिसळताना सपुत्रिक जोडप्यांशी चर्चा करतात. तिथेच लहानग्या मुलांशी खेळताना शोभणार नाही, म्हणून गाण्यात भांडू लागतात. घरी परतल्यानंतर भांडणाची पहिली फेरी पार पाडल्यावर अ‍ॅनाच्या डोक्यात आपल्यातील निरंतन झगडय़ाला संपविण्याचा मार्ग सापडतो. म्युझिकल बॅण्ड उभारून आपली सगळी भांडणे गाण्यातून करण्याची कल्पना ती बेनच्या गळी उतरवते. गॅरेजमध्ये ठेवलेल्या दोन इलेक्ट्रिक गिटार्सची धूळ झटकली जाते आणि ‘डर्टी डिशेश’ नामक बॅण्डचा आरंभ लग्न वाचविण्याचा उतारा म्हणून केला जातो.

गमतीशीर क्रोधपूर्ण गीतांची मालिका अ‍ॅना आणि बेन रचायला लागतात. शेजारी राहणारा डेव्ह (फ्रेड आर्मिसन) हा बराचसा विक्षिप्त ड्रमर त्यांना साथसंगत करायला लाभतो. अर्थातच संगीतनिर्मितीतील कल्पकता आपोआप त्यांच्यातील भांडण कमी करण्यास मदत करते. अ‍ॅना वही वगैरे घेऊन दोघांच्यातील ‘टॉप टेन’ भांडणांची यादी करते. एकमेकांना पूर्णत: समजून घेण्याची अधिक शक्यता या प्रयोगातून दिसायला लागते. दोघेही कमालीच्या आनंदात वावरू लागतात. भांडणे पूर्णपणे थांबत नाहीत, पण एकमेकांना स्वीकारण्याच्या अतिसमंजस पातळीकडे पोहोचण्यासाठीची पहिली पायरी पार केली जाते. चित्रपट आजच्या कुटुंब आणि लग्नसंस्थेतील अनेक त्रुटी आणि मर्यादांचे उपायांसह सूक्ष्मलक्ष्यी दर्शन घडवितो. आज वाढत जाणाऱ्या टोकाच्या व्यक्तिवादी, एककल्ली विचारसरणीत लग्नसंस्थेचे महत्त्व विशद करतो. इथल्या समदु:खी जोडप्यांच्या क्रोधशामक अवस्था सार्वकालिक आणि सर्वव्यापी असल्या तरी संगीत प्रवासाने त्यात भरलेली गंमत प्रचंड परिणामकारक आहे. झोई-लिस्टर जोन्स आणि अ‍ॅडम पॅली यांनी चित्रपटातील एकमेकांच्या आकलनयुद्धाला सर्वोत्तम अभिनयाद्वारे सजविले आहे.

मिरांडा जुलै हिच्या ‘मी अ‍ॅण्ड यू अ‍ॅण्ड एव्हरीवन वी नो’ आणि ‘द फ्युचर’ किंवा डय़ुप्लास बंधूंच्या नातेसंबंधांवरील चित्रपटांच्या पंगतीत बसवावा असा हा विचारप्रवर्तक देखणा चित्रपट आहे. लग्नारंभी किंवा कोणत्याही टप्प्यावर वास्तवाची जाणीव करून देत क्रोधशमनाचा उतारा म्हणून त्याकडे पुन्हा पुन्हा पाहता येईल.