माणसाला इच्छामरण किंवा दयामरणाचा अधिकार द्यावा का, यावर नेहमीच जोरदार चर्चा आणि वादविवाद रंगत असतात. सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपर्यंतही हा विषय चíचला गेला आहे. मुंबईतील केईएम इस्पितळामधील एक परिचारिका अरुणा शानभाग हिच्यावर एका सफाई कामगाराने केलेल्या बलात्कारानंतर ती कोमात गेली होती आणि तब्बल ४२ वर्षे ती त्या अवस्थेत होती. तिला दयामरण देऊन तिची या भीषण अवस्थेतून सुटका करावी, या मागणीसाठी पत्रकार पिंकी विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु इस्पितळातील अरुणाच्या सहकारी परिचारिका तिची मनापासून सेवाशुश्रूषा करीत असल्याने आणि त्यांचा तिला दयामरण द्यायला विरोध असल्याने ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. तथापि, ब्रेनडेड झालेल्या किंवा जी व्यक्ती निव्वळ जीवरक्षक यंत्रणेच्या साहाय्याने नावापुरतीच जीवित आहे; अन्यथा जिच्या जगण्याला काही अर्थ उरलेला नाही, अशा व्यक्तीला तिच्या निकटच्या नातलगांच्या संमतीने जीवरक्षक यंत्रणा काढून घेऊन मृत्यूच्या अधीन होऊदेण्यास याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त मान्यता दिली. परंतु त्याकरिता अशा व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी आधी उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे पूर्वपरवानगी घ्यायला हवी आणि न्यायालयानेही अशा प्रकरणांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीची नेमणूक करून तिच्याकडून ‘त्या’ व्यक्तीसंबंधात वैद्यकीय अहवाल मागवावा आणि त्यानंतरच याचिकेवर निर्णय द्यावा अशी शर्तही घातली आहे. संसदेत जोवर याबद्दलचा कायदा संमत होत नाही तोवर सर्वोच्च न्यायालयाची ही मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात असतील. भारतीय संसदेते मात्र अद्यापि हा कायदा पारित झालेला नाही.
या पाश्र्वभूमीवर इच्छामरण/दयामरणावरचे ‘बंध-मुक्त’ हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. इच्छामरण/दयामरणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं हे नाटक आहे. एका टीव्ही चॅनेलवरील ‘ऑनलाइन ओपिनियन’ या कार्यक्रमात ‘इच्छामरण आणि दयामरण’ या विषयावर सुरू असलेल्या चर्चेला अकस्मात वेगळीच कलाटणी मिळून चर्चकांच्याच व्यक्तिगत जीवनातील एक वास्तव घटना सामोरी येते आणि त्यावर आधारीत मीडिया ट्रायलचे स्वरूप त्या चर्चेला येते. त्या विशिष्ट घटनेशी संबंधित मंडळीच चॅनलवर चर्चक म्हणून हजर असल्याने आरोप-प्रत्यारोप, दावे, पुरावे, सवाल-जबाब, उलटतपासणी असा सगळा रीतसर कोर्ट मामलाच चर्चेत होतो. विवेक आपटे लिखित आणि डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित ‘बंध-मुक्त’ हे नाटक या अशा वेगळ्या विषयाला हात घालणारं तर आहेच; शिवाय त्यासाठी निवडलेला फॉर्मही तितकाच उत्कंठावर्धक आहे.
‘दयामरण/ इच्छामरण’ या विषयावरच्या टीव्ही चॅनेलवरील चर्चेत क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट डॉ. वर्षां रामराजे या आपले म्हणणे मांडत असताना अचानक पॅनलवरील दुसरे एक चर्चक (आणि डॉ. वर्षां रामराजे यांचे पती) कर्करोगतज्ज्ञ डॉ. आनंद रामराजे यांच्यावरच घसरतात. आपल्या कर्करोगग्रस्त काकांचा- ब्रिगेडियर मरतडराव थोरात यांचा आकस्मिकरीत्या झालेला मृत्यू हाही असाच संशयास्पद होता असा दावा त्या करतात. आपण भावाच्या (अ‍ॅड. अभिजीतच्या.. आणखीन एक चर्चक) लग्नाला गेलेलो असताना डॉ. आनंद यांच्या वैद्यकीय देखरेखीखाली मरतडराव होते. कर्करोगामुळे जरी त्यांचा मृत्यू समीप आलेला असला, तरी डॉ. वर्षां या लग्नाला गेलेल्या असताना त्यांची प्रकृती तशी स्थिर होती. परंतु अ‍ॅड. अभिजीतच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. आनंद त्यांना मरतडराव काल रात्री अचानक गेल्याचे कळवतात. डॉ. वर्षां घरी परतण्याआधीच ते त्यांचे अंत्यसंस्कारही उरकून टाकतात. हा सगळा प्रकार डॉ. वर्षां यांना संशयास्पद वाटतो. परंतु डॉ. आनंद यांना त्यांच्या वडिलांच्या पश्चात मरतडरावांनीच लहानाचे मोठे केलेले असल्याने त्यांच्या मृत्यूला डॉ. आनंदच जबाबदार आहते किंवा कसे, याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम असतो. टीव्हीवरील जाहीर चर्चेत मात्र त्या आपला हा संशय बोलून दाखवतात आणि मोठीच ठिणगी पडते.
डॉ. आनंद यांना पत्नीच्या या आरोपाने जबर धक्का बसतो. कारण लष्करात कर्नलपदी असलेले त्यांचे वडील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. त्या चकमकीतील लष्करी चमूचे नेतृत्व ब्रिगेडियर मरतडराव थोरात यांनी केले होते. आणि त्यांनीच ही प्रत्यक्षदर्शी घटना लहानग्या आनंदला सांगितली होती. आणि नंतर आपल्या या शहीद मित्राच्या अनाथ मुलाला- आनंदला बापाचं छत्र देऊन त्यांनीच लहानाचं मोठं केलं होतं. ज्यांना आपण आपले वडील मानलं होतं अशा मरतडरावांच्या मृत्यूस आपण जबाबदार आहोत असा संशय आपल्या पत्नीला यावा आणि तिने टीव्हीवरील जाहीर चर्चेत त्याची वाच्यता करावी, याने डॉ. आनंद अक्षरश: हतबुद्ध होतात. तिचा हा संशय ते साफ उडवून लावतात. दुसरे एक चर्चक (आणि डॉ. वर्षांचे भाऊ) अ‍ॅड. अभिजीत यांनाही वर्षांचा हा संशय अनाठायी वाटतो. ते डॉ. आनंदचीच बाजू घेतात. परंतु नंतर शब्दाला शब्द वाढत जातो आणि वाद चिघळत गेल्यावर त्यांनाही आपल्या बहिणीच्या म्हणण्यात काहीएक तथ्य असावंसं वाटू लागतं. या चर्चेतील मानवाधिकार कार्यकर्त्यां मिस् चंद्रिका यांना मात्र डॉ. आनंदवरील आरोप केवळ अनाठायीच नव्हे, तर साफ चुकीचा वाटतो. त्याचं सयुक्तिक कारण मात्र त्या नीटसं देऊ शकत नाहीत. त्यातून वर्षांचा संशय आणखीनच बळावतो. डॉ. आनंदची बाजू घेणाऱ्या या बाई कोण? त्यांचा-तिचा काय संबंध? आनंदही याचा काही पटण्याजोगा खुलासा करीत नाही. पुढच्या चर्चेत स्वाभाविकपणेच आरोप-प्रत्यारोप, जाबजबाब, उलटतपासणी वगैरे होत राहते. प्रकरण कोर्टात जाण्यापर्यंत ताणलं जातं.
अखेर काय निष्पन्न होतं त्यातून? डॉ. आनंदने मरतडरावांना इच्छामरण वा दयामरण दिलेलं असतं का? दिलं असेल तर ते नेमकं कशासाठी? की त्यांचा मृत्यू नैसर्गिकच होता?.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच उचित ठरेल.
लेखक विवेक आपटे यांनी कौशल्यानं हे रहस्यरंजक नाटय़ रचलं आहे. प्रेक्षकांची उत्सुकता हळूहळू वाढवीत नेत उत्कर्षबिंदूप्रत जाण्यासाठी त्यांनी योजलेला टीव्हीवरील मीडिया ट्रायलचा फॉर्मही चपखल आहे. या नाटकाचा शेवट प्रेक्षकांच्या कौलानुसार केला जातो. म्हणजे- डॉ. आनंदने मरतडरावांना दयामरण/इच्छामरण दिले, अथवा त्यांचा मृत्यू हा नैसर्गिकच होता- या दोन पर्यायांपैकी ज्या पर्यायास प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळेल त्यानुसार प्रयोगागणिक नाटकाचा शेवट वेगवेगळा केला जातो. मी पाहिलेल्या प्रयोगात प्रेक्षककौलानुसार, मरतडरावांचा मृत्यू हा नैसर्गिकच होता असा शेवट केला गेला. परंतु त्यात मानवाधिकार कार्यकर्त्यां मिस् चंद्रिका यांचे डॉ. आनंदशी नेमके काय आणि कसे संबंध होते, हे त्यात स्पष्ट झाले नाही. त्यांचं एकूणात केलेलं उठवळ चित्रण हे मानवाधिकार कार्यकर्त्यांची खिल्ली उडवण्यासाठी केलं गेलं होतं, की व्यक्तिवैचित्र्यासाठी, हे कळत नाही. त्यामुळे डॉ. वर्षां यांच्या संशयाला पुष्टीच मिळते. लेखकानं हे जर हेतुत: केलेलं असेल तर मिस् चंद्रिकेच्या व्यक्तिरेखेला काहीएक ठोस पृष्ठभूमी देणं गरजेचं होतं. परंतु तशी ते न देता मिस् चंद्रिकाचं उच्छृंखल, थिल्लर चित्रण करणं योग्य नाही. प्रेक्षकानुनयासाठी जर हे केलं गेलं असेल तर नाटकाच्या मूळ गंभीर प्रकृतीलाही ते मारक ठरतं.
दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी प्रयोग अत्यंत बंदिस्तपणे बांधलेला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा अत्यंत ठाशीव होईल हे त्यांनी पाहिलं आहे. मीडिया ट्रायलमधील कृतकता व फोलपणाही त्यांनी जाता जाता अधोरेखित केला आहे. कोंबडी झुंजवून चॅनेलचा टीआरपी वाढवण्याची चढाओढ त्यातून लक्षात येते. चॅनेलकरता जरी अशा चर्चा हा टीआरपीचा फंडा असला तरी इथे प्रत्यक्ष त्या घटनेत गुंतलेले घटक आमनेसामने आलेले दाखवले आहेत. व्यक्तिगत जीवनात ते एकमेकांशी नात्याने तसेच भावनिक व मानसिकदृष्टय़ाही बांधलेले आहेत. आणि या चर्चेत ते एका गंभीर गुन्ह्य़ाच्या घटनेचे अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे ही चर्चा त्रयस्थ विषयावरील राहू शकत नाही.. राहतही नाही. त्यातून सर्वसंबंधितांच्या व्यक्तिगत जीवनात जे वादळ निर्माण होतं त्याच्याशी चॅनेलला काहीच देणंघेणं नसतं. पण ही मंडळी प्रत्यक्ष त्यात गुंतलेली आहेत, त्याचं काय? त्यांची आयुष्यं या मीडिया ट्रायलमुळे नक्कीच उद्ध्वस्त होऊ शकतात. खरं तर हा एक स्वतंत्र नाटकाचा विषय आहे. ‘बंध-मुक्त’मध्ये त्याला जाता जाता स्पर्श केला गेलाय, इतकंच. डॉ. बांडिवडेकरांनी नाटक चढत्या भाजणीने रंगवत नेलं आहे. प्रसंगोपात ते अधिकाधिक उत्कंठावर्धक होत जातं. त्याचा शेवट काहीही (दोन पर्यायांपैकी कुठलाही) झाला तरी तो अप्रस्तुत वाटणार नाही याची पुरेपूर काळजी दिग्दर्शक डॉ. बांडिवडेकर यांनी अत्यंत कौशल्यानं घेतली आहे.
नेपथ्यकार राजन भिसे यांनी चॅनेलचा स्टुडिओ आणि डॉ. आनंदचं घर उत्तम उभं केलं आहे. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेनं आणि राहुल रानडे यांच्या पाश्र्वसंगीतानं नाटय़ांतर्गत नाटय़पूर्ण क्षण गडद-गहिरे होतात. चैत्राली डोंगरे यांची वेशभूषा आणि अनिकेत काळोखे यांची रंगभूषा पात्रांना यथार्थता देते.
डॉ. वर्षां रामराजेंच्या भूमिकेत केतकी थत्ते यांनी क्रिमिनल सायकॉलॉजिस्टची प्रत्येक गोष्टीची तार्किक चिरफाड करण्याची संशयग्रस्त वृत्ती ही एक माणूस म्हणून, पत्नी म्हणून तिच्या भूमिकेवर कशी हावी होते, हे प्रत्ययकारकरीत्या दाखवलं आहे. त्यांना गाण्याचंही उत्तम अंग आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी डॉ. आनंद रामराजेंची गोची, एक सच्चा डॉक्टर आणि माणूस म्हणून चाललेला त्याचा आंतरिक संघर्ष, स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यात आलेल्या अपयशानं उद्भवलेली उद्विग्नता, त्याचबरोबर सत्य आपल्या बाजूने असूनही या मीडिया ट्रायलमध्ये आपणास दोषी ठरवण्याचे आपल्याच माणसांकडून होत असलेले प्रयत्न.. या सगळ्यात भरडली गेलेली एक भावनाशील व्यक्ती अंतर्मनीच्या नाना भावकल्लोळांसह उत्तम साकारली आहे. शंतनू मोघे यांनी अ‍ॅड्. अभिजीतची वकिली आक्रमकता आणि व्यक्तिगत नात्यातील स्नेहाद्र्रता यांतला समतोल छान साधला आहे. विवेक आपटे यांनी सूत्रधाराच्या भूमिकेत लावलेला नको इतका तटस्थ स्वर चांगलाच खटकतो. नाटय़पूर्णतेला छेद देण्याकरता दिग्दर्शकानं योजलेली ही विरोधाभासी क्लृप्ती असेल तर गोष्ट अलाहिदा. पण तरीही त्यामुळे नाटकाचा आलेख काहीसा खाली येतोच. मिस् चंद्रिकाचा थिल्लरपणा लतिका सावंत यांनी वागण्या-बोलण्यातून यथायोग्यरीत्या दर्शवला आहे. राजन बने यांनी ब्रिगेडियर मरतडराव थोरातांच्या भूमिकेत लष्करी अधिकाऱ्याचा ताठा व रूबाब दाखवण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केला आहे; परंतु त्यांचं उपजत व्यक्तिमत्त्व लष्करी अधिकाऱ्यास शोभेसं नाही.
‘बंध-मुक्त’मधील त्रुटी आणि उणिवा वगळताही एक खिळवून ठेवणारा प्रयोग पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना नक्कीच मिळतं.
केतकी थत्ते, शंतनू मोघे, डॉ. अमोल कोल्हे आणि लतिका सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा