प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं १६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांबद्दल असणाऱ्या आवडीसाठीही चर्चेत असायचे. बप्पीदा यांच्या निधनानंतर त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय करणार, याबद्दल त्यांच्या मुलानं माहिती दिली.
बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं की, बप्पी लहरीसाठी यांच्यासाठी सोनं घालणं हे फक्त फॅशन स्टेटमेंट नव्हतं. सोनं त्यांच्यासाठी लकी होतं. व्हॅटिकन सिटीपासून हॉलिवूडपर्यंत त्यांनी जगभरातील प्रत्येक भागातून सोनं गोळा केलं. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार, सर्व ठिकाणचं सोनं गोळा करून त्याचे दागिने घातले.”
बाप्पाने त्याचे वडील बप्पी लहरी यांचे सोन्याशी आध्यात्मिक संबंध असल्याचेही सांगितले. “त्यांनी दागिन्यांशिवाय कधीही प्रवास केला नाही. पहाटे ५ वाजता फ्लाईट असली तरी ते सर्व सोनं घालायचे. ते त्या सोन्याशी दागिण्यांशी आध्यात्मिकरित्या जोडलेले होते. त्यामुळे आम्ही ते जपून ठेवणार आहोत. सोनं ही त्यांची सर्वात आवडती गोष्ट होती. लोकांनी त्यांच्या वस्तू पाहाव्यात अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही त्या संग्रहालयात ठेवू. त्यांच्याकडे शूज, सनग्लासेस, टोपी, घड्याळं आणि दागिन्यांचं कलेक्शन होतं, ते त्यांच्या चाहत्यांना पाहता यावं म्हणून ते जपून ठेवू आणि त्याचं प्रदर्शन भरवू,” असं बाप्पा लहरीने सांगितलं.
दरम्यान, सोन्यावरील प्रेमाबद्दल एका मुलाखतीमध्ये बप्पी लहरी यांना विचारण्यात आलं होतं. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबद्दल खुलासा केलेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते, “हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम गळ्यात सोनसाखळी घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोन्याचे दागिने घालतो.” इतकच नाही तर पुढे बोलताना बप्पीदांनी, “गाण्यासोबत सोनं ही माझी वेगळी ओळख झाली आहे,” असंही सांगितलं होतं.