प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी १६ फेब्रुवारीला निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर आज १७ फेब्रुवारीला त्यांच्या पार्थिवावर जुहूमधील पवन हंस स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा बप्पा लहरी यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
बप्पी लहरी यांची अंत्य यात्रा त्यांच्या जुहूमधील घराकडून १० वाजता निघाली होती आणि ११ वाजता पवन हंस स्मशानभूमीकडे पोहोचली. त्यानंतर काही वेळासाठी त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. बप्पी लहरी यांच्या अंत्य यात्रेत त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यतिरिक्त अलका याग्निक, विद्या बालन, रुपाली गांगुली, सुनील पाल हे सेलिब्रेटी सहभागी झाले होते.
याशिवाय भूषण कुमार, निखिल द्विवेदी आणि बब्बर सुभाष यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटी स्मशानभूमीमध्ये उपस्थित होते. गायक मीका सिंह देखील बप्पी लहरी यांच्या अंत्य दर्शनासाठी स्मशानभूमीत पोहोचला होता. बप्पी लहरी यांचं पार्थिव जेव्हा स्मशानभूमीत नेलं जात होतं तेव्हा त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते. त्यांचा व्हायरल व्हिडीओ सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा आहे.
दरम्यान बप्पी लहरी यांनी वयाच्या १७ वर्षीच त्यांना संगीतकार व्हायचं आहे हे ठरवून टाकलं होतं. एसडी बर्मन त्यांच्यासाठी प्रेरणा होते. ते त्यांचीच गाणी ऐकून संगीताचा रियाज करत असत. ८० च्या दशकात बप्पी लहरी यांनी बॉलिवूडला डिस्को डान्सची ओळख करून दिली. ताहिर हुसैनच्या ‘जख्मी’ चित्रपटातून बप्पी लहरी यांना स्वतःची वेगळी ओळख मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायक आणि संगीतकार अशी दुहेरी भूमिका पार पाडली. याच चित्रपटानं त्यांना प्रसिद्धीही मिळवून दिली होती. त्यांनी अखेरचं गाणं ‘भंकस’ हे २०२०मध्ये चित्रपट ‘बागी ३’साठी गायलं होतं.