प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी एक असे प्रसिद्ध संगीतकार आणि पार्श्वगायक होते. ज्यांच्या डिस्को संगीतानं लोकांना वेड लावलं होतं. बप्पी लहरी यांनी ताल वाद्यं आणि पाश्चिमात्य संगीत यांचं मिश्रण असलेली डिस्कोथेक शैली विकसित केली होती. एवढंच नाही तर त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं होतं.
बप्पी लहरी यांनी जेव्हा त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती तेव्हा संगीतातील त्यांच्या नव्या प्रयोगामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. पण नंतर मात्र श्रोत्यांनी त्यांच्या या संगीताचं खूप कौतुक केलं आणि त्यांना बॉलिवूडमध्ये डिस्को किंग या नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी बॉलिवूडला रॉक आणि डिस्को या संगीत प्रकाराची ओळखच करून दिली नाही तर त्याच्या तालावर थिरकण्यासाठी भाग पाडलं होतं. ८० च्या दशकात त्यांच्या गाण्यांनी बॉलिवूडवर अक्षरशः राज्य केलं होतं.
आणखी वाचा- Bappi Lahiri Passes Away : एक असे गायक- संगीतकार, ज्यांच्या डिस्को म्यूझिकनं सर्वांना लावलं वेड
बप्पी लहरी यांच्या गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांनी बॉलिवूड अनेक अप्रतिम गाणी दिली. एवढंच नाही तर त्यांच्या याच गाण्यांची दखल गिनीज बुकनंही घेतली होती. १९८६ साली बप्पी लहरी यांनी जवळपास ३३ चित्रपटांसाठी १८० गाणी रेकॉर्ड केली होती. अवघ्या वर्षभरात एवढी गाणी रेकॉर्ड करणं अर्थातच सोप्प नव्हतं. त्यामुळेच बप्पी लहरी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं.
आणखी वाचा- जेव्हा राजकुमार यांनी बप्पी लहरींच्या दागिण्यांची उडवलेली खिल्ली; म्हणाले होते, “मंगळसूत्राची…”
बप्पी लहरी यांनी वयाच्या १७ वर्षीच त्यांना संगीतकार व्हायचं आहे हे ठरवून टाकलं होतं. एसडी बर्मन त्यांच्यासाठी प्रेरणा होते. ते त्यांचीच गाणी ऐकून संगीताचा रियाज करत असत. ८० च्या दशकात बप्पी लहरी यांनी बॉलिवूडला डिस्को डान्सची ओळख करून दिली. ताहिर हुसैनच्या ‘जख्मी’ चित्रपटातून बप्पी लहरी यांना स्वतःची वेगळी ओळख मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायक आणि संगीतकार अशी दुहेरी भूमिका पार पाडली. याच चित्रपटानं त्यांना प्रसिद्धीही मिळवून दिली होती. त्यांनी अखेरचं गाणं ‘भंकस’ हे २०२०मध्ये चित्रपट ‘बागी ३’साठी गायलं होतं.