अभिनेत्री बरखा बिष्ट (Barkha Bisht) ही टीव्ही मालिका आणि बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर बरखानं अनेक कलाकृतींमधून तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. २१ वर्षांपूर्वी ‘कितनी मस्त है जिंदगी’ या मालिकेद्वारे तिनं टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश केला. मात्र, सुरुवातीला अभिनेत्रीला या क्षेत्रात खूप संघर्ष करावा लागला होता. याच संघर्ष काळाबद्दल बरखानं नुकत्याच एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. अवघ्या २३ व्या वर्षी ‘बालाजी टेलिफिल्म्स’चा शो सोडल्यानंतर तिला अडचणी आल्या. त्याबद्दल बरखानं तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत बरखानं निर्माती एकता कपूरविरुद्ध (Ekta Kapoor) दिलेल्या न्यायालयीन लढ्याबद्दल सांगितलं. यावेळी तिनं सांगितलं की, हा खटला बरखानं स्वतः लढवला. तसेच त्यावेळी तिनं त्यामागील काही कारणंही उघड केली. बरखानं असंही म्हटलं की, एकता कपूर माझं करिअर संपवू शकली असती; परंतु तिनं माघार घेतली.
एकता कपूरविरुद्धच्या कायदेशीर खटल्याबद्दल बरखा असं म्हणाली, “मी घरी कोणालाही सांगितलं नाही. मी एका वकिलाची मदत घेतली आणि तो खटला लढवला. कालांतरानं त्या व्यक्तीला कळलं की, हे व्यर्थ आहे आणि मी तिची आभारी आहे की, तिनं माघार घेतली. त्यावेळी एकतामध्ये तुमचं करिअर घडवण्याची किंवा तोडण्याची ताकद होती आणि आजही ती ते करू शकते. हा खटला जवळजवळ एक वर्ष चालला आणि मी माझ्या नवीन शोचं चित्रीकरण चालू ठेवलं आणि प्रत्येक न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहिले.”
पुढे बरखा म्हणाली, “मी अभिमानानं सांगून आले होते की, मी जे काही करेन, ते मी स्वतः करेन. स्वत:च्या हिमतीवर करेन. म्हणून मला ते स्वतःला हाताळावं लागलं. त्यामुळे मी याबद्दल तेव्हा घरी काहीही सांगितलं नव्हतं. एक नवीन कलाकार म्हणून माझी कारकीर्द संपू शकली असती; पण काही दैवी शक्तीमुळे एकता मागे हटली. जर तिला हवं असतं, तर ती माझं करिअर संपवू शकली असती.”
दरम्यान, बरखा बिष्टनं एकता कपूरच्या ‘कितनी मस्त है जिंदगी’ या शोमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर बरखाला प्रत्येक शोमध्ये भूमिका मिळू लागल्या. त्यामुळे बरखाला असं वाटू लागलेलं की, जर तिनं अशाच प्रकारे प्रत्येक टीव्ही मालिकेमध्ये काम करायला सुरुवात केली, तर तिला कधीही मुख्य भूमिका मिळू शकणार नाही. म्हणूनच तिनं ‘बालाजी टेलिफिल्म्स’चा शो मधेच सोडला. त्यानंतर एकता कपूरनं तिच्याविरुद्ध खटला दाखल केला.