रवींद्र पाथरे

After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
flood in nagpur on Ambazari lake due to vivekanand statue
नागपूर :पुरासाठी पुतळा कारणीभूत ठरला का ? एक वर्षांनंतरही प्रश्न अनुत्तरित
7 year old boy killed in leopard attack in durgapur area of chandrapur
बाप रे…पहिल्या वर्गातील मुलाला बिबट्याने दातात धरले  आणि…
Mobile thieves pune, Mobile theft pune,
पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ, ३०० जणांचे मोबाइल चोरी; नाशिक, मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
balmaifal ganpati prasad
बालमैफल: प्रसाद… डबल डबल!
Buldhana, leopards, leopards caught Buldhana,
बुलढाणा : मानव-वन्यजीव संघर्ष; तब्बल पाच बिबट जेरबंद…

डॉ.सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ ही कादंबरी वाचनात आली तेव्हा एक भयंकर जीवघेणी अस्वस्थता अन् बेचैनी मनाला बराच काळ ग्रासून राहिली होती. साऱ्या मानवजातीला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यालाच दोन वेळची चटणी-भाकरी मिळू नये इतकं त्याचं जीणं दयनीय व्हावं, या जाणिवेनं आतडय़ांत कालवाकालव झाली होती. ‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय परीटघडीच्या शहरी जाणिवा बाळगणाऱ्या मंडळींना नेहमी टीकेचा, टवाळखोर शेरेबाजीचा वाटावा यावेगळं निबर असंवेदनशीलतेचं लक्षण दुसरं काय असू शकतं? या देशाचं सरकारच जिथे शेतकऱ्यांप्रती कमालीचं असंवेदनशील आहे, तिथे इतरांची काय कथा? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या हवेतल्या गमजा मारणारं सरकार शेतकरी आत्महत्यांनी मात्र ढिम्म हलत नसेल तर त्या वल्गना म्हणजे केवळ ‘बोलाचीच कढी’ हे सुज्ञांस वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

एकीकडे हवामानबदलामुळे पावसाचं चक्र आणि प्रमाण दिवसेंदिवस बेभरवशी होत चाललंय. त्यापायी दुष्काळाचं संकट सदानकदाच पाचवीला पूजलेलं. यंदा तरी चांगला पाऊस पडेल, भरघोस पीक येईल या आशेवर कर्ज घेऊन पेरणी करावी, तर पर्जन्यराजा तोंडावर आपटतो. केलेली पेरणी मातीला मिळते. दुबार पेरणीसाठी पुन्हा दामदुप्पट व्याजाने सावकारांकडून कर्ज घ्यावं लागतं. एवढं करूनही पीक हाती येईल याची हमी नाही. बरं, कधी चांगला पाऊस पडला, पीक उत्तम आलं, तरी पुढे अवकाळी पाऊस त्याचं मातेरं करणारच नाही याची शाश्वती नाही. या सगळ्या अडचणींतून तरलंच पीक; तर त्याला रास्त भाव मिळेल का, याची चिंता. बहुतेकदा चांगलं पीक आलं की भाव पडतात. मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे फिरून पुन्हा शेतकरी रस्त्यावरच! तशात पिढीगणिक वाटणीपायी आक्रसत गेलेली शेतजमीन. वाटय़ाला आलेल्या तोकडय़ा जमिनीच्या तुकडय़ावर चार-सहा जणांचं कुटुंब निभावणं मुश्कीलच. त्यात आणखी पोरांची शिक्षणं, ज्येष्ठांचं आजारपण, भावंडांची लग्नकरय, आलं-गेलं, पैपाहुणं.. या सगळ्यांचा मेळ बसवताना कास्तकाराचं कंबरडं मोडतं. तो कर्जाच्या चिखलात रुतत जातो. आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा झाला की स्वत:च्या गळ्याला फास लावून घेतो. ही कर्मकहाणी आता सबंध ‘भारता’चीच झाली आहे.

बरं, शेतकऱ्याची पोरं शिकली तरी त्यांना नोकऱ्या मिळतातच असं नाही. पोटाला चिमटे काढून पोराला शिकवलं आणि तो घरात बेकार बसला आहे, हे दृश्य गावागावांत दिसतं. त्यातून येणाऱ्या  वैफल्यग्रस्ततेतून त्यांचं मग व्यसनं, वाईट मार्गाला जाणं ओघानं होतंच. तरण्या पोरांच्या हाताला काम नाही. बरं, शिकल्यामुळे वावरात राबणंही त्यांना कमीपणाचं वाटतं. शिकूनसवरून नोकरी नाही, स्वत:च्या वाढलेल्या अपेक्षांमुळे धड शेतीही करता येत नाही, आणि समजा- केलीच, तरी पीक हाती लागत नाही. कर्जाचा डोंगर वाढत चाललेला. मन वैफल्यानं ग्रासलेलं. अशात तारुण्याच्या म्हणून काही गरजा असतात.. स्वप्नं असतात. त्यांचीही धूळमाती नाकातोंडात चाललेली. आपलं आयुष्य कधी मार्गी लागणार? की नाहीच लागणार? चहुबाजूंनी फक्त अंधारच अंधार! कसं या भवसागरातून तरायचं?

‘बारोमास’मधलं हे अत्यंत भीषण विखारी वास्तव! केवळ ‘बारोमास’मधलंच नाही, तर ग्रामीण भागांतल्या घराघरांत आज हेच वास्तव आहे. लेखक-दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी ‘बारोमास’ रंगमंचित करण्याचं ठरवून तिचं नाटय़रूपांतर केलं आणि पुस्तकाच्या पानांतलं हे विश्व रंगावकाशात सादर झालं. सहसा कादंबरीच्या माध्यमांतरात मूळ ऐवज हरवल्याची तक्रार अनेकदा केली जाते, परंतु ‘बारोमास’ नाटकाने मूळ साहित्यकृतीचं यथातथ्य रंगमंचीय सादरीकरण झालं आहे यात शंकाच नाही. किंबहुना, कादंबरी जो अस्वस्थानुभव देते, त्याचीच प्रचीती नाटकातूनही मिळते, इतके ते अस्सल उतरलं आहे.

विदर्भातील एका शेतकरी कुटुंबातील ही कथा आहे. २६ एकर शेती असूनही पाऊसपाण्यानं वर्षांनुवर्ष दगा दिल्यानं कर्जाचं खटलं वाढत गेलेलं. घरातले एकनाथ आणि मधू हे दोघंही मुलगे चांगले शिकलेले. पण नोकरी न मिळाल्यानं वावरात खितपत पडलेले. एकनाथ एम. ए., बीएड.! पण तरीही पैसा आणि वशिल्याअभावी नोकरीचं कुठंच न जमल्यानं नाइलाजानं शेतीत उतरलेला. प्रामाणिकपणे शेती करू बघणारा. त्याचं शिक्षण, त्यातून मिळू शकणारं संभाव्य पांढरपेशी आयुष्य तसंच त्याचं कवीमन बघून निमशहरी गावातल्या अलकानं त्याच्याशी लग्न केलेलं. पण ना त्याला नोकरी मिळाली, ना शेतातून काही हाती लागलं. त्यात आणखीन अशिक्षित अन् पारंपरिक मानसिकतेच्या एकनाथच्या घरानं अलकाची आणखीनच कोंडी केली. तिची सगळी स्वप्नं विझू विझू झाली. या सगळ्याला विटून ती माहेरचा रस्ता धरते. एकनाथचीसुद्धा चहुबाजूंनी घुसमट होते. ना नोकरी, ना शेतीत यश. तशात घरातली भांडणं. बायकोचं घर सोडून जाणं. परिस्थितीच्या काचामुळेत्यालाही जगणं नकोसं झालेलं. हताश भाऊ गुप्तधनाच्या वेडानं पछाडला. वडील प्रपंचातून अंग काढून विरागी झाले. करावं तरी काय करावं माणसानं? सगळ्यांचीच फरफट चाललेली. याचंच भयावह, अस्वस्थ करणारं चित्र म्हणजे ‘बारोमास’!

लेखक-दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी अत्यंत सफाईदारपणे आणि ताकदीनं ‘बारोमास’मधलं वास्तव नाटय़रूपात सादर केलं आहे. व्यक्ती, घटना, परिस्थिती, माणसांचं जगणं, त्यातले पेच आणि त्यातून झालेली माणसांची विचित्र कोंडी.. हे सारं त्यांनी नाटकात अस्सलतेनं उतरवलं आहे. माणसं त्यांच्या भल्याबुऱ्या कृती आणि भावनांनिशी यात प्रकटताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं योग्यही असू शकतं. परिस्थितीनं सगळ्यांचीच गोची केलेली आहे. ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कुणालाच सापडत नाहीए. आणि समजा दिसला, तरी त्या मार्गानं जाण्याचं धाडस अन् तशी वृत्ती तर हवी ना मुळात? या कोंडीतून सर्वाच्या भाळी एक कुंचबलेपण लिहिलं गेलंय. त्यात एकनाथसारख्या विचारी, संवेदनशील माणसाची तर फारच विटंबना होते. शेतकरी कोणत्या टोकाच्या परिस्थितीत आत्महत्या करीत असावेत याचा दाखला नाटक पाहताना मिळतो. ‘बारोमास’ ही भोवतालचं दाहक, बोचरं, घायाळ करणारं वास्तव आणि त्यातून माणसांचा होत जाणारा निरुपाय यांच्यातली असमान लढाई आहे. तीत एकनाथ, अलका, मधू यांचं भरडलं जाणं अपरिहार्यच आहे. फक्त ते बघताना, अनुभवताना तीव्र क्लेश होतात. वेदना होतात. प्रयोगात पारंपरिक ओवीसदृश गाण्याचं उपयोजन आणि ‘धोंडी.. धोंडी’ या गाण्याच्या समूहनृत्यातून अलका आणि एकनाथपुढची परिस्थिती अधोरेखित करण्यातली कलात्मकता दाद देण्याजोगीच. लेखक-दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी ‘बारोमास’मधलं ग्रामीण वास्तव इतक्या धगधगीतपणे मांडलं आहे, की त्याचं सजीव वर्णन अवघड आहे. आपण केवळ नाटकातूनच ते अनुभवू शकतो.

सुमित पाटील यांनी सांकेतिक आणि वास्तवदर्शी नेपथ्याचा मेळ घालत नाटय़स्थळं साकारली आहेत. श्याम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेद्वारे ‘बारोमास’मधलं भीषण विश्व टोकदार केलं आहे. सिद्धार्थ हजारेंच्या पार्श्वसंगीतानंही त्यास तीव्रतेची जोड दिली आहे. शरद सावंत (रंगभूषा) आणि दीपाली ज्ञानमोठे व श्रुती कुंटे (वेशभूषा) यांनी पात्रांना व्यक्तिमत्त्वं बहाल केली आहेत. अमृता दीक्षित (ओवी) व हर्षदा बोरकर (नृत्यं) यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे.

एकनाथच्या भूमिकेत योगेश खांडेकर यांनी त्याची व्यथावेदना आणि घुसमट उत्कटतेनं दर्शविली आहे. भोवतालाशी लढता लढता माणूस एके दिवशी पिचून जातो. थकतो. कोलमडून पडतो. या सगळ्या भावनांचे कल्लोळ त्यांनी ताकदीनं दाखवले आहेत. अमृता मोडक यांनी अलकाची परिस्थितीनं चालवलेली फरफट, हतबल, बेकार नवऱ्याबद्दल एकीकडे वाटणारी कणव, चीड आणि दुसरीकडे आपल्या स्वप्नांचं चक्काचूर होणं- या कात्रीतलं तिचं दुभंग वर्तन मन पिळवटतं. एकनाथच्या आईच्या भूमिकेत राजश्री गढीकर चपखल बसल्या आहेत. त्यांचं वागणं-बोलणं, हातवारे, स्वभाव त्यांनी आत्मगत केला आहे. परिस्थितीनं वैफल्यग्रस्त झाल्यानं अंधश्रद्धेच्या वाटेनं निघालेला मधू- संजीव तांडेल यांनी धुमसणाऱ्या संतापातून अभिव्यक्त केला आहे. शशिकांत म्हात्रे (एकनाथचे विरागी बाबा), नीलिमा सबनीस (अलकाची टिपिकल आई), श्रुती कुंटे (अलकाची व्यवहारवादी बहीण- जयू), हिरेन परब (अलकाचे समंजस बाबा), उमेश महाले, रोहित चौधरी, विजय वारुळे, संतोष वेरुळकर अशा सर्वच कलाकारांनी आपापली कामं चोख केली आहेत.

‘बारोमास’चा हा तीव्र जाणिवेचा अस्वस्थानुभव शेतकऱ्यांची सद्य:स्थिती समजून घेण्यासाठी तर पाहायला हवाच; त्याचबरोबर एका कलात्मक जीवनानुभवासाठीदेखील निश्चित पाहायला हवा.