शोले हा हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोन सिनेमा आहे. या सिनेमाबाबत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या सिनेमातली बसंती ही आजही स्त्री शक्तीचे प्रतीक आहे असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. शोले या सिनेमाला 43 वर्षे उलटून गेली तरीही लोकांना बसंती हे पात्र लक्षात आहे. भारतीय सिनेसृष्टीत बसंती ही अशी व्यक्तीरेखा होती जिने सिनेमात टांगा चालवला. त्याआधीच्या स्त्री व्यक्तीरेखा अशा नसत. ती एक स्वतंत्र महिला असल्याचे सिनेमात रेखाटण्यात आले आहे. ती टांगा चालवते आणि त्याचप्रमाणे आपले घरही चालवते. त्याचमुळे बसंती हे असे पात्र आहे जे स्त्री सक्षमीकरणाचे प्रतीक आहे असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शोले सिनेमा आणि बसंतीबाबत त्यांची भूमिका मांडली. मी आजही ज्या ठिकाणी प्रचाराला जाते तिथे काम करणाऱ्या महिलांची भेट घेते आणि त्यांना हे सांगते की त्यांचे समाजाच्या जडणघडणीतले काम मोठे आहे. महिला कठोर परिश्रम करतात. ज्या महिला कष्ट करून त्यांचे घर चालवतात त्यांना मी वंदन करते त्यांच्या प्रती माझ्या मनात आदर आहे असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
याच कार्यक्रमात हेमा मालिनी यांना लाल पत्थर या सिनेमातील नकारात्मक व्यक्तीरेखेबाबत विचारण्यात आले. तेव्हा हेमा मालिनी म्हटल्या की त्यावेळी राज कुमार यांनी मला ती भूमिका साकारून पाहा असा सल्ला दिला होता. ती भूमिका साकारणे हा माझ्यासाठी एक प्रयोग होता. मी ती भूमिका आपल्याला जमते की नाही याचे आव्हान ठेवून स्वीकारली होती. याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा बसंती या भूमिकेचा विषयही काढला. लोकांना आजही माझ्या ड्रीम गर्ल या उपाधीपेक्षा बसंती हे नाव जास्त लक्षात आहे. कारण बसंती ही भूमिका स्त्री शक्तीचे प्रतीक ठरली आहे. याच कार्यक्रमात आपल्याला सत्यजीत रे यांच्यासोबत काम करता आले नाही याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.