डीसी कॉमिक्सचा यशस्वी सुपरहिरो बॅटमॅन लोकप्रिय असूनही त्यांचे चित्रपट चालले नाहीत. मायकेल कीटन, ख्रिश्चन बेल आणि मग बेन अ‍ॅफ्लेक अशा तिन्ही कलाकारांनी बॅटमॅन साकारला. पण ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’ आणि ‘जस्टीस लीग’ या दोन्ही चित्रपटांच्या अपयशानंतर बेनकडून तिसरा चित्रपटही काढून घेण्यात आला आहे. बॅटमॅनची नव्याने जुळवाजुळव सुरू झाली असून आता रॉबर्ट पॅटिन्सन या नव्याकोऱ्या बॅटमॅन अवतारात दिसणार आहे, त्यानिमित्ताने बॅटमॅनच्या आठवणी..

आपण आपल्या दैनंदिन जीवनात जी काही पुस्तकं, मालिका, चित्रपट पाहतो या सर्व प्रकारांतून शेकडो काल्पनिक व्यक्तिरेखा आपल्या भेटीस येतात. त्यातील अनेक जण वर्षांनुर्वष आपल्या डोक्यात घर करून राहतात, परंतु त्यातील फार मोजक्या व्यक्तिरेखा अशा असतात, ज्या आपल्या मेंदूत खोलवर प्रभाव पाडतात. या व्यक्तिरेखा कळत-नकळत आपल्या वृत्तीत बदल करतात, ज्यांच्यामुळे आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण आपण या व्यक्तिरेखांशी जोडले जातो. त्यांची ध्येयं, महत्त्वाकांक्षा, समस्या अगदी आपल्यासारख्याच असतात. त्यांनाही आपल्याइतक्याच मर्यादा असतात. परंतु तरीही समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर त्या यशस्वीरीत्या मात करतात. या व्यक्तिरेखा मर्यादित शक्तिनिशी सातत्याने लढण्याची प्रेरणा देतात. अनेकदा आपण स्वत:ला त्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या जागी ठेवून विचार करू लागतो. आणि कळत-नकळत आपण त्यांचे अनुकरण करू लागतो. ‘बॅटमॅन’ही अशाच व्यक्तिरेखांपैकी एक आहे जो आपल्याला प्रेरणा नाही तर जगण्याचे उद्दिष्टं देतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘बॅटमॅन’चे निर्माता बॉब केन यांच्या मते दु:खालाही प्रेरणा बनवून लढण्याचा विश्वास म्हणजे बॅटमॅन. ‘बॅटमॅन’ हा डीसी कॉमिक्सचा सर्वात यशस्वी सुपरहिरो आहे. मार्च १९३९ साली ‘द डिटेक्टिव्ह कॉमिक # २७’ मार्फत ‘बॅटमॅन’ची निर्मिती करण्यात आली. ब्रूस वेन नामक एका सामान्य मुलाचे ‘बॅटमॅन’मध्ये होणारे हे रूपांतर आज तब्बल ७८ वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे. पण असे काय आहे ‘बॅटमॅन’मध्ये जे वर्षांनुवर्ष आपल्याला प्रेरित करते आहे.

‘बॅटमॅन’ आणि भीती हे जणू समानार्थी शब्द आहेत. डर के आगे जीत है! हे वाक्य आपण अनेकदा ऐकले आहे. या वाक्याचे शब्दश: अनुकरण ‘बॅटमॅन’ करतो. ‘बॅटमॅन’चे संपूर्ण तत्त्वज्ञान हे मुळातच भीती केंद्रित आहे. प्रत्येक मानवाच्या मनात कसली ना कसली भीती असतेच. काहींना स्टेजवर जाऊ न चारचौघांत बोलण्याची भीती वाटते, काहींना उंचीची भीती वाटते, काहींना पाण्यात पोहण्याची भीती वाटते तर काहींना पाल, झुरळ, कोळी यांसारख्या कीटकांची भीती वाटते. भीतीही प्रत्येक मानवात असणारी एक मूलभूत भावना आहे. भीती म्हणजे जणू अंधारच आणि या अंधाराचाच ‘बॅटमॅन’ आसरा म्हणून वापर करतो. लहानपणी ‘बॅटमॅन’ ऊर्फ ब्रूस वेन खेळताना एका खोल खड्डय़ात पडतो. या खड्डय़ात गडद अंधार व शेकडो वटवाघुळे असतात. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाचा ब्रूसच्या बालमनावर वाईट परिणाम होतो. तो अंधाराला घाबरू लागतो. अंधाराबाबत त्याच्या मनात फोबिया निर्माण होतो. फोबिया म्हणजे एक प्रकारची एखाद्या वस्तूची अथवा प्रसंगाची भीती असते, ही भीती ताण व अति चिंतेमुळे होणाऱ्या मानसिक आजारात गणली जाते. परंतु पुढे तो आपल्या भीतीचा सामना करतो. पालकांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा तो त्याच खड्डय़ात जाऊ न शांतपणे उभा राहतो, जिथे या भीतीची सुरुवात झालेली असते. आज ‘बॅटमॅन’ याच अंधाराचा वापर गुन्हेगारांना पकडण्यासाठी करतो. ‘बॅटमॅन’च्या मते त्याच्या यशाचे गुपित त्याच्या भीतीत दडले आहे. जो भीतीवर नियंत्रण मिळवतो तो आयुष्यात काहीही करू शकतो.

स्वत:च्या मनावर संपूर्ण नियंत्रण हा ‘बॅटमॅन’ तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ब्रूस वेन हा काही जन्मत: सुपरहिरो नव्हता. तोदेखील इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच एक सामान्य मुलगा होता. गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेल्या या मुलाला कशाचीच कमतरता नव्हती. परंतु एके दिवशी त्याच्या आई-वडिलांचा खून होतो. आणि त्याचे संपूर्ण आयुष्य एकाएकी बदलून जाते. लहान असताना आपल्याला असे वाटते की काहीही झाले तरी आपले संरक्षण करण्यासाठी आपले पालक आहेतच. परंतु जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे या विश्वासातील फोलपणा आपल्या लक्षात येऊ  लागतो. पालकांचे सुरक्षाकवच हे तात्पुरते असते. परंतु हे कवच अगदी लहान वयातच गमावले तर त्याचा बालमनावर खूप खोल परिणाम होतो. ब्रूस वेनही अशाच मुलांपैकी एक होता, पण त्याने विचलित न होता आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले. वेदनेचा हुंकार आपले सामथ्र्य वाढवण्यासाठी करणाऱ्यांपैकी ‘बॅटमॅन’ एक आहे. यासाठी त्याने आपल्या भावनांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे. त्याचे हे कमालीचे नियंत्रण गमावणे म्हणजे ब्रूस वेनच्या शरीरातून ‘बॅटमॅन’चा आत्मा जाणे असा त्याचा अर्थ होतो.

सुपरहिरोंच्या जगात आजवर आपण जितके खलनायक पाहिले आहेत. त्यापेक्षा जास्त खतरनाक व मानसिकरीत्या व्यथित करणारे खलनायक आपल्याला ‘बॅटमॅन’ मालिकेत पाहता येतात. जोकर, स्केअर क्रो, पॉयजनरी, पेंग्विन यांसारख्या अनेक भयानक खलनायकांचे प्रताप आपल्याला ‘बॅटमॅन’मध्ये पाहता येतात. जर आपण या सर्व खलनायकांचे व्यवस्थित निरीक्षण केले तर हे सर्व जण अगदी ‘बॅटमॅन’चेच नकारात्मक प्रतिबिंब असल्याचे आपल्याला लक्षात येते. म्हणजे ज्याप्रमाणे ‘बॅटमॅन’ आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगांना आपल्या यशाचे इंधन म्हणून वापरतो, तसाच काहीसा प्रयत्न हे खलनायक करताना दिसतात. त्यांची महत्त्वाकांक्षा, जिद्द, तत्त्व अगदी आपल्याला आदर्शवत वाटणाऱ्या रिअल लाइफ हिरोंप्रमाणेच आहेत. परंतु यांच्यात आणि ‘बॅटमॅन’मध्ये असलेला एकमेव फरक म्हणजे उद्देश. हे खलनायक आपली संपूर्ण शक्ती गॉथम शहराची नासधूस करायला वापरतात. त्यांच्या मते जो त्रास त्यांनी लहानपणापासून भोगला आहे त्याची भरपाई संपूर्ण समाजाने करावी. तर दुसरीकडे ‘बॅटमॅन’बरोबर उलटी भूमिका घेताना आपल्याला दिसतो. त्याने भोगलेला त्रास इतर कोणालाही होऊ  नये यासाठी तो प्रयत्नशील असतो. परंतु हे सर्व खलनायक तिथेच वार करतात जिथून ‘बॅटमॅन’ला तोडता येईल. स्केअर क्रो रासायनिक पदार्थाच्या मदतीने फोबिया निर्माण करतो, पेंग्विन मानसिकरीत्या व्यथित करतो, बेन त्याची प्रबळ इच्छाशक्ती तोडण्याचा प्रयत्न करतो तर आजवरचा सर्वात खतरनाक खलनायक म्हणून नावलौकिक मिळवणारा जोकर ‘बॅटमॅन’ला तो त्याच्याचसारखा असल्याचे पटवून देतो. तो आपल्या अफाट संभाषण कौशल्याच्या जोरावर ‘बॅटमॅन’च्या तत्त्वावरच घाला घालतो. त्यामुळे ‘बॅटमॅन’चा संघर्ष हा शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारांविरोधात नाही तर त्याच्या स्वत:शीच सुरू असलेला आपला दिसतो. परंतु या सातत्याने सुरू असलेल्या संघर्षांत ‘बॅटमॅन’ टिकून राहतो, कारण या संघर्षांमागचा त्याचा उद्देश. ‘बॅटमॅन’च्या मते यशाच्या प्रवासात आपल्या उद्देशाला महत्त्व असते. कारण हा उद्देशच असतो जो आपले ध्येय ठरवतो, प्रतिकूल परिस्थितीत आपले संरक्षण करतो व अनुकूल परिस्थतीत पुढे जाण्याची प्रेरणा देतो आणि ब्रूस वेनसारख्या एका सामान्य मुलाला सुपरहिरो बॅटमॅन बनवतो.