बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट सध्या प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. मात्र, ट्विटवरवर या चित्रपटाला घेऊन एका वेगळ्याच युद्धाला सुरूवात झाली आहे.
या चित्रपटातील काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत ट्विटरवर #BoycottPK या टॅगअंतर्गत ‘पीके’विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानंतर ट्विटरवर चित्रपटासंदर्भात अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. या चित्रपटात भारतीय देवतांची खिल्ली उडवण्याबरोबरच भारतीय युवती आणि पाकिस्तानी युवक यांच्यातील प्रेमकहाणीवर आक्षेप घेत तब्बल २० हजार लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
तर दुसरीकडे, ‘पीके’च्या समर्थनार्थ काहीजणांनी #WeSupportPK ही मोहीम सुरू करत, या चित्रपटाकडे फक्त मनोरंजनात्मक दृष्टीने पाहण्याचे आव्हान केले. चित्रपट आणि धर्माची गल्लत न करता हा चित्रपट पाहिला पाहिजे, असे चित्रपटाच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यापूर्वी ‘पीके’ चित्रपटाच्या पोस्टरवरूनदेखील असेच वादळ निर्माण झाले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनाविताना, ज्यांना ही गोष्ट पसंत नसेल, त्यांनी चित्रपट बघू नये. मात्र, यामध्ये अकारण धर्माला ओढू नये. मनोरंजनासाठी निर्माण झालेल्या गोष्टींकडे त्याच पद्धतीने बघितले गेले पाहिजे, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले होते.

Story img Loader