येत्या ४ डिसेंबरला सिनेमागृहात दाखल होणा-या ‘बाय गो बाय’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा कलावंत आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत रंगला. रोम्यांटिक आणि  नृत्यप्रधान  गाण्यांसह सिने रसिकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला खुणावणा-या ठसकेबाज एटमसॉंगने या सोहळ्यात धम्माल केली. त्यातही तोडीस तोड असणा-या प्रोमोशन सॉंगने ‘बबबब बाय गो बाय’ने या चित्रपटातील गोष्टीची उत्सुकता वाढवली.
‘बाय गो बाय’ची गोष्ट आहे नायकांची वाडी या गावातील बायजाची. नायकांच्या वाडीला बायजा बायकांची वाडी करून टाकते. या गावातील महिला सर्व अधिकार आपल्या हाती घेतात आणि पुरुषांचे स्थान पाळीव प्राण्यांसारखे होऊन जाते. बायजाक्काच्या म्हणण्यानुसारच, गाव वागत असते. पुरुषांनी मिशा वाढवायच्या नाहीत, घरातील कामे करायची असे फर्मानच काढले जाते. इतकेच काय, गावात बाळाचा जन्मही होत नाही. थोडक्यात बायजाक्का पुरुषांवर एकप्रकारे सूडच घेत असते. पण का ? हे चित्र बदलतं का? आणि कसं? या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पहायला मिळतील.
नाटक, मालिका आणि चित्रपटांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या निर्मिती सावंत ‘बाय गो बाय’ या चित्रपटात पुरुषांवर अधिराज्य गाजवणा-या बायजाक्काची महत्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटात निर्मिती सावंत, विजय पाटकर, नयन जाधव, शशिकांत केरकर, शीतल फाटक, जयवंत भालेकर यांच्यासह  पूर्णिमा अहिरे केंडे, प्रशांत चौडप्पा, पूनम खैर, दीपक आलेगावकर, कृतिका तुळसकर, परी पिंपळे, मयूर पवार आदींच्या भूमिका आहेत.